वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षासह किंवा स्वतंत्रपणे लोकसभेच्या सात जागा लढवू, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी  संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी येथे दिली.

संघटनेच्या विदर्भ प्रदेश कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीचे आयोजन विद्यादीप सभागृहात करण्यात आले होते.

शेट्टी म्हणाले, निवडणुकीपूर्वी आपल्या मागण्या पूर्ण करण्याची हमी देणाऱ्या भाजपने सत्तेवर येताच त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच मुद्दय़ावर आम्ही रालोआशी नाते तोडले. आमच्या अटी विरोधी पक्षाने मान्य केल्या तर भाजपविरोधातील आघाडीला समर्थन देऊ. अन्यथा स्वबळावर लढू.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांना चळवळीची जोड देण्याची गरज आहे. त्याखेरीज े प्रश्न सुटणार नाहीत. शेतकरी बोंडअळीच्या समस्येने त्रस्त आहे  याकडे सरकारने डोळेझाक केली. यावर्षी मूग, उडीद, सोयाबीन उत्पादकांना चांगला फायदा होण्याची अपेक्षा होती, पण व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याने हा शेतमाल हमीभावापेक्षा कमी भावाने विकावा लागला. कारण सरकारचे नियंत्रणच नाही. याच अन्यायाविरोधात आमची संघटना ऑक्टोबर महिन्यात मोठे आंदोलन उभे करणार आहे.

सुबोध मोहिते यांना उमेदवारी

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, वर्धा व नंदुरबार या सात लोकसभा मतदारसंघात आमचे उमेदवार उभे राहणार असून वध्रेत माजी मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी दिली जाईल, अशी घोषणाही खासदार शेट्टी यांनी केली.