राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळात कृषीविषयक विधेयकं मंजूर झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल. पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. आमच्या हातात दगड आहेत व तुमच्या काचा आहेत अशा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केला आहे. शेतकऱ्यांचा हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांची मुलं हातात दगड घेतील असंही ते म्हणाले आहेत.

राजू शेट्टींनी व्हिडीओत म्हटलं आहे की, “पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेत शेतकरी विरोधी कायदे समंत करुन घेतलेत. पण त्याची अमलबजावणी कशी करणार हे आम्हाला पहायचं आहे”.

पुढे ते म्हणाले आहेत की, “भलेही तुम्ही कटकारस्थान करुन आणि इतर राजकीय पक्षांच्या सहकाऱ्याने शेतकऱ्याला कॉर्पोरेट सेक्टरच्या घशात घातलं. त्याला शहरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हमीभाव हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो जर काढून घेण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस या देशातील करोडो शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील. या दगडांमध्ये तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत हे लक्षात ठेवा”.