दुधाला ५ रूपये दरवाढ मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदालन सुरू केले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी दुधाचे टँकर आणि दुधाच्या पिशव्या फोडून रस्त्यावर फेकून देण्यात आले आहे. पण खासदार राजू शेट्टी यांनी मात्र कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. डोक्यावर बर्फ ठेवा, संयम सोडू नका, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

आमचे आंदोलन शहरी लोकांच्या किंवा सर्वसामान्य जनतेच्याविरोधात नाही. आम्हाला योग्य दर मिळावा हीच आमची मागणी आहे. शेतकऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे कार्यकर्ते, शेतकरी चिडले. त्यातून ही प्रतिक्रिया समोर आल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांनी सकाळ-संध्याकाळ दोन वेळा गावातून फेरी काढावी. आपल्याला दूध विकायचे नाही. दूधच विकले नाही तर महाराष्ट्रात दूध तुटवडा निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्राला जितक्या दुधाची मागणी आहे. ती कोणीच पूर्ण करू शकत नाही. फक्त तीन ते चार दिवस आंदोलन केले तर सरकारला गुडघे टेकावेच लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले.

आम्ही दूध सांडलेले नाही. जे सांडले आहे ते काही हजार लिटरमध्येच आहे. आम्ही लाखो लिटर दूध विद्यार्थी, गोरगरीब आणि वारकऱ्यांना मोफत दिले आहे. आम्ही दूध विकणार नाही. पण ज्यांना दूध पाहिजे त्यांनी आमच्या गोठ्यापर्यंत यावे. आम्ही त्यांना मोफत दूध देऊ. पण शेतकरी कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.