राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे विधान परिषदेत निवडून जाण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांची भेट घेण्यासाठी जयंत पाटील कोल्हापुरात आले होते. यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. जयंत पाटील यांनी यावेळी राजू शेट्टी यांनी याबाबत प्रस्ताव दिला असून शरद पवारांसोबत पार पडणाऱ्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल असं सांगितलं आहे. राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीची ऑफर स्वीकारणार का ? असं विचारण्यात आलं असता उत्तर आल्यानंतरच पुढील निर्णय घेऊ असं सांगितलं आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी
“माझ्या आईची तब्बेत थोडी बरी नसते. जयंत पाटील माझ्या आईच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आले होते. साहजिकच आहे यावेळी काही अनौपचारिक चर्चा, गप्पा झाल्या. बोलता बोलता ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरलं होतं. त्यावेळी आम्हाला काही देता आलं नाही, पण आता पवारसाहेब कोकण दौऱ्यावरुन मुंबईत आल्यावर चर्चा करुन निर्णय करण्याचा प्रयत्न करु,” असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीवेळी स्वाभिमानीसाठी राष्ट्रवादीने एक जागा सोडायचं ठरलं होतं. आता ती द्यायची की नाही केव्हा द्यायची, शब्द पाळायचं की नाही हे त्यांच्या नेतृत्त्वावर अवलंबून आहे. मी फक्त जे ठरलं आहे त्याची आठवण करुन दिली. ऑफर स्वीकारायची की नाही हा निर्णय त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर घेऊ. मला वाटतंय आठवडाभरात पवार साहेबांसोबत बैठक होईल. त्यावेळी होय की नाही ते ठरेल,” अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.