सत्ताधारी पक्षाचा घटक पक्ष असतानाही शासनाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काबूत ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ देऊ करण्याचे खेळी खेळण्यात आली आहे. तोटय़ातील महामंडळ स्वाभिमानीच्या गळ्यात घालून महामंडळाचा बुडता गाडा सावरण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष, बुलढाण्याचे रविकांत तुपकर यांना यंत्रमाग व्यवसायातील अनुभव नसल्याने ते महामंडळाची जबाबदारी कशी पेलणार हे लक्षवेधी ठरले आहे.
डगमगता डोलारा असलेल्या यंत्रमाग महामंडळाच्या इचलकरंजीतील कार्यालयात पहिले पाऊल टाकल्यानंतर तुपकर यांनी तोटय़ातील महामंडळ फायद्यात आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर खासदार राजू शेट्टी यांनी यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून कापड व्यवसायातील भ्रष्ट साखळी मोडून महामंडळाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा विडा उचलला असल्याचे सांगितले आहे.
केंद्रात व राज्यात भाजपा प्रणीत शासन आल्यानंतर काही दिवसातच स्वाभिमानीचे सत्ताधाऱ्यांशी असलेले मधुर संबंध संपुष्टात आले. स्वाभिमानीने मूळच्या पदावर येत विविध मुद्यांवरून केंद्र व राज्य शासनाला टीकेचे लक्ष केले. प्रखर विरोधकांप्रमाणे साखर आयुक्तालयाची तोडफोड करून आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने लढत असल्याचे दाखवून दिले. गेल्या आठवडय़ात सांगली येथे ऊस परिषद भरून ‘केंद्र व राज्य शासनाची सक्तीची मस्ती उतरवू,’ अशा टोकधार भाषेत आव्हान दिले होते. राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या तडाखेबंद भाषणामुळे राज्य शासनाची प्रतिमाही खालावत चालली होती. या पाश्र्वभूमीवर भाजपाच्या पुढाकाराने मित्र पक्षांशी बठक घेऊन त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. या पदावर शेट्टी यांनी तरुण रक्ताचे रवीकांत तुपकर यांची निवड करून मुख्यमंत्र्यांच्या विदर्भात संघटनेचे जाळे पसरत राहिल याची सोय पाहिली आहे.
स्वाभिमानीने यंत्रमाग महामंडळाची धुरा खांद्यावर पेलण्याचे ठरविले असले तरी हे महामंडळ गेली अनेक वष्रे तोटय़ात असल्याने ते सावरणे हीच खरी कसोटी आहे. खेरीज, अन्य महामंडळाच्या तुलनेत यंत्रमाग महामंडळाला मिळणारी प्रतिष्ठा आणि तेथील एकूण उलाढाल ही सुध्दा मर्यादित आहे.
स्वाभिमानीकडे महामंडळ गेल्यापासून घटक पक्षातच पोटदुखी सुरू झाली असून तोटय़ातील महामंडळ गळ्यात मारल्याच्या प्रतिक्रियांना जोर आला आहे. या मार्गाने स्वाभिमानीची एका अर्थाने कोंडी केली असल्याचाही सूर व्यक्त होत आहे.

आव्हान पेलणार
बहुतेक महामंडळे तोटयातच असल्याने यंत्रमाग महामंडळ त्यास अपवाद नाही असे स्पष्ट करून खासदार राजू शेट्टी यांनी राज्य शासनाला हे महामंडळ पांढरा हत्ती वाटणार नाही याची काळजी घेत व्यावासायिक युती अवलंबून महामंडळाला ऊर्जतिावस्था प्राप्त करू असा विश्वास व्यक्त केला आहे.  रविकांत तुपकर यांनी आपल्याला कापूस व्यवहारातील अनुभव असून आता त्यातील मूल्यवर्धिततेचा भाग म्हणून वस्त्र निर्मितीला आकार देऊन महामंडळाला प्रतिष्ठा मिळवून देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.