News Flash

स्वच्छतेच्या योजनाबद्ध कामांमुळेच नाशिकचा दिल्लीत सन्मान

|| अनिकेत साठे सध्या कोणत्याही गावात फेरफटका मारा, तुमचे स्वागत स्वच्छताविषयक भित्तिचित्र अन् संदेशांनी होईल. प्रत्येक गावात किमान पाच भित्तिचित्र आणि १० संदेश रेखाटण्याचे लक्ष्यच

नाशिक जिल्ह्य़ात स्वच्छता अभियानातंर्गत गावोगावी असे भित्तिचित्र रेखाटण्यात आले आहे.

|| अनिकेत साठे

सध्या कोणत्याही गावात फेरफटका मारा, तुमचे स्वागत स्वच्छताविषयक भित्तिचित्र अन् संदेशांनी होईल. प्रत्येक गावात किमान पाच भित्तिचित्र आणि १० संदेश रेखाटण्याचे लक्ष्यच जिल्ह्य़ातील १३६८ ग्रामपंचायतींना देण्यात आले होते. शिवाय, सार्वजनिक ठिकाणे, अंगणवाडी, शाळांमध्ये शौचालयांची स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे महिनाभरात युद्धपातळीवर करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत केंद्रीय समिती कोणत्या गावात येईल, हे ज्ञात नसल्याने सरसकट सर्व गावांचे रंगरूप पालटले गेले. उद्देश एकच ग्रामस्थांमध्ये आपले गाव स्वच्छ ठेवण्याची मानसिकता रुजावी. ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात कसर ठेवण्यात आली नाही. त्याची फलनिष्पत्ती केंद्र सरकारचे दोन पुरस्कार मिळवण्यात झाली. दृश्य अन् ऑनलाइन स्पर्धेत आघाडीवर राहिलेले नाशिक वैयक्तिक शौचालयांच्या प्रत्यक्ष वापरात अपेक्षित यश कधी मिळवणार, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गत देशव्यापी ऑनलाइन प्रतिक्रिया नोंदविण्यात प्रथम, तर या सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून देशाच्या पश्चिम विभागात तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल नाशिक जिल्ह्य़ाचा दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी हा सन्मान स्वीकारला. ऑगस्ट महिन्यात देशभरात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-२०१८ अभियान राबविण्यात आले होते. त्यात जिल्ह्य़ातील १६ ग्रामपंचायतींची केंद्रस्तरीय समितीने तपासणी केली. त्यातील कामांची दखल घेण्यात आली. तसेच केंद्र सरकारने विकसित केलेल्या भ्रमणध्वनी अ‍ॅपद्वारे नाशिकने सर्वाधिक प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. ऑनलाइन प्रक्रियेत प्रतिक्रिया नोंदविणे अवघड नसते. नाशिक हा सधन जिल्हा. ग्रामीण भागात बहुतेकांच्या हाती स्मार्ट भ्रमणध्वनी खुळखळतो. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. एकत्रित फौज कामाला भिडल्यावर प्रतिक्रियांचा पाऊस कोसळणे स्वाभाविकच. स्वच्छ सर्वेक्षणात शौचालय उपलब्धता आणि वापर, कचरा-सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतेचे प्रमाण, सार्वजनिक जागेवरील स्वच्छता, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजाराची ठिकाणे, मंदिरे अशा ठिकाणांवरील स्वच्छतेच्या सुविधा, स्वच्छ भारत मोहिमेची अंमलबजावणी आदी मुद्दय़ांवर पडताळणी झाली. समिती दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर, गावोगावी स्वच्छता फेरी, गृहभेटी, मोटारसायकल फेरी, श्रमदान मोहीम आदींद्वारे जनजागृती करण्यात आली. महिनाभरात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांची साफसफाई, स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात आली. ग्रामस्वच्छता, शोषखड्डे, पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता, गटारींची साफसफाई झाली. प्रत्येक ग्रामपंचायतीत भित्तिचित्र आणि संदेश रंगविण्यात आल्याचे पाणीपुरवठा-स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले. शौचालयांचा नियमितपणे वापर व्हावा यासाठी दोन हजार स्वच्छतागृहींची नियुक्ती करण्यात आली आहे.

सातत्यपूर्ण कामाची गरज

समिती येणार म्हणून झालेली वातावरणनिर्मिती सातत्याने जाणीव-जागृती न झाल्यास औटघटकेची ठरू शकते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे एक लाख ३० हजार शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करून मार्च २०१८ अखेरीस नाशिक जिल्हा हागणदारीमुक्त म्हणून जाहीर झाला. निफाड, मालेगाव, बागलाण असे काही तालुके वगळता आदिवासी तालुक्यांमध्ये शौचालय वापराचे प्रमाण कमी आहे. अनेक ठिकाणी त्याचा भंगार, तत्सम सामग्री ठेवण्यासाठी वापर होतो. सर्वेक्षणाच्या निमित्ताने गावांचे सुशोभीकरण झाले. नेत्रसुखद बदल घडले, परंतु उघडय़ावर शौचास जाऊ नये, ही मानसिकता आजही पूर्णपणे बदललेली नाही.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मागील तीन वर्षांत प्रशासनाने स्वच्छतेच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. शौचालयबांधणी, तत्सम उपक्रमांसाठी केंद्राच्या निधीचीही प्रतिक्षा केली नाही. जिल्हा नियोजन मंडळामार्फत शौचालयबांधणीसाठी सुमारे ३५ कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला. १०० टक्के शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्वीच साध्य करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमातही जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ग्रामस्थांना सोबत घेऊन हे काम झाल्यामुळे या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सर्वाची मेहनत आणि जनतेचा सहभाग यामुळे हे यश मिळाले. – राधाकृष्णन बी.  (जिल्हाधिकारी, नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 1:03 am

Web Title: swachh bharat mission in nashik
Next Stories
1 नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस गृहसंकुलाचे उद्घाटन; १६८ घरांचा आधुनिक प्रकल्प
2 भेटीगाठी कमी अन् भ्रमंती अधिक
3 स्वाइन फ्लू, डेंग्यूच्या साथीला पालिका प्रशासन जबाबदार
Just Now!
X