सोलापूर : करोनाकाळात गेले आठ महिने बंद असलेली धार्मिकस्थळे आज दिवाळी पाडव्यापासून दर्शनासाठी खुली झाली. सोलापूर जिल्ह्यात पंढरपुरात विठ्ठल मंदिरासह अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर पहाटे उघडले गेले. त्यामुळे भाविकांमध्ये आनंद व्यक्त होत असून देवस्थान परिसरात शासकीय नियम व अटींचे तंतोतंत पालन करीत भाविकांना दर्शनासाठी मंदिरांमध्ये सोडले जात आहे.
सोलापुरात ग्रामदैवत श्री सिध्देश्वर देवस्थानात पहाटे धार्मिक विधी होऊन भाविकांसाठी दर्शन खुले झाले. देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह मान्यवरांनी सिध्देश्वर महाराजांचे दर्शन घेतले. अक्कलकोट येथे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात पहाटे नित्यनियमानुसार काकड आरती झाली. त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले तेव्हा भाविकांनी सामाजिक अंतर राखत, सॕनिटायझरचा वापर करत शिस्तीने मंदिरात प्रवेश केला. तत्पूर्वी, मंदिरात काल संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरणा करण्यात आले होते. मंदिरात एकाचवेळी गर्दी होऊ नये म्हणून टप्प्या-टप्प्याने भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात होता. पहाटे आमदार सचिन कल्याणशेट्टी व मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सपत्नीक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची पूजा केली. यावेळी स्वामीनामाच्या जयजयकाराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी भाविकांच्या समाधान आणि उत्साह संचारला होता.
वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरालगतच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळही आठ महिन्यांनी भाविकांच्या सेवेसाठी पुनःश्च हरिओम करीत सुरू झाले. दुपारी श्री स्वामी समर्थ महाराजांना गोड नैवेद्य दाखवून पूजाविधी पूर्ण झाला. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाची सेवा खुली करण्यात आली. यावेळी अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्यासह सचिव शाम मोरे व उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या नेटक्या नियोजनाखाली भाविकांसाठी महाप्रसादासह,पाच हजार यात्रेकरूंच्या निवासाची क्षमता असलेल्या यात्री निवासाची सेवा पूर्ववत सुरू झाल्यामुळे तेथील वातावरणही चैतन्यमय बनले होते. दरम्यान, भाविक व दानशूर व्यक्तींनी अन्नछत्र मंडळास सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन जन्मेंजयराजे भोसले यांनी केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 16, 2020 2:46 pm