News Flash

सुषमा मला ‘शरद भाऊ’ म्हणायच्या, पवारांची भावनिक प्रतिक्रिया

सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले.

भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. स्वराज यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. स्वराज यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांपासून क्रीडा आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी ट्विटरच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी स्वराज यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळाही दिल्या.

सुषमा स्वराज यांचे निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या, संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या, अशी भावना शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

शरद पवार यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही सुषमा स्वराज यांच्याप्रति ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आहे. सुषमाजी यांच्या जाण्याने अभ्यासू, कर्तृत्ववान नेतृत्व देशाने गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

आज बुधवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव नवी दिल्लीतील भाजपाच्या केंद्रीय कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 3 वाजता लोदी रोड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, भारतीय राजकारणातलं एक तेजोमय पर्व हरपलं अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 1977 साली वयाच्या 25 व्या वर्षी सुषमा स्वराज या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. सर्वात कमी वयाच्या त्या कॅबिनेट मंत्री ठरल्या होत्या. 1977 ते 1979 दरम्यान त्यांच्या खांद्यावर सामाजिक कल्याण, रोजगार यांसारख्या 8 महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. यानंतर 1979 मध्ये 27 व्या वर्षी त्या हरियाणाच्या भाजपाच्या अध्यक्षा बनल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 12:40 pm

Web Title: swaraj great politician says sharad pawar nck 90
Next Stories
1 कोल्हा’पुरात’ परिस्थिती गंभीर; नौदलाची पथके मदतीसाठी दाखल
2 पूरग्रस्तांची ना विचारपूस, ना मदतीचा हात
3 फुकट कोळंबीसाठी ग्रामस्थ पुराच्या पाण्यात
Just Now!
X