शहरात स्वाइन फ्लूचा प्रकोप सुरूच असून मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी दिवसभरात ४ रुग्ण मरण पावले आहेत. अजूनही स्वाइन फ्लूच्या वॉर्डात १० रुग्ण आहेत. यातील ३ जणांना लागण झाल्याचा अहवाल आहे, तर अन्य ७ जण संशयित आहेत. मृत रुग्णांमध्ये एक जळगाव जिल्ह्य़ातील असून, दोन रुग्ण पैठणचे तर एक रुग्ण औरंगाबाद शहरातील आहे.
पैठण शहरातून महेंद्र रवींद्र नरवडे या १० वर्षांच्या मुलाला घाटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्याला स्वाइन फ्लूची लागण झाली होती. मंगळवारी रात्री नऊच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. पैठण तालुक्यातील राजापूर येथील खालेद तय्यब शहा या संशयित रुग्णाचाही पहाटे मृत्यू झाला. मात्र, या व्यक्तीला किडनीचाही आजार असल्याचे तपासणीत आढळून आले. त्यामुळे त्याच्या लाळेचे नमुने पाठविले असले, तरी त्याला स्वाइन फ्लू होता, असे खात्रीने सांगता येत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे. जळगाव जिल्ह्य़ातील इंदरचंद देवचंद सखाला यांना ६ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या लाळेच्या नमुन्यात स्वाइन फ्लूचे विषाणू आढळून आले. पहाटे त्यांचा मृत्यू झाला. औरंगाबाद शहरातील छावणी परिसरातील बालाजी मंदिर परिसरातील राहणाऱ्या शाहेदा बेगम फारुख (वय ५०) यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. गेल्या २४ तासात ४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५ रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
नाथषष्टीनिमित्त प्रशासनाचा सल्ला
दरम्यान, उद्यापासून (गुरुवार) पैठण येथे नाथषष्ठीनिमित्त मोठय़ा प्रमाणात भाविक दाखल होत असल्याने योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. मोठय़ा प्रमाणात वैद्यकीय पथके स्थापन करण्यात आली आहेत.