पुणे : राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे, मात्र उन्हाळ्याच्या आगमनाबरोबर नाहीसा होणारा स्वाइन फ्लू अद्यापही राज्यात मुक्कामी आहे. १ जानेवारी २०१९ पासून ते १० एप्रिलपर्यंत राज्यात तब्बल चौऱ्याण्णव रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. नाशिक, नागपूर, पुणे आणि अहमदनगर शहर तसेच जिल्ह्य़ांमध्ये स्वाइन फ्लूमुळे दगावलेल्यांची संख्या अधिक आहे.

थंडीचे वातावरण स्वाइन फ्लू विषाणूच्या प्रसारासाठी पोषक असते, असा सर्वसाधारण समज आहे. यंदा मात्र थंडी संपून उन्हाळा सुरू झाला तरी स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. १ जानेवारी २०१९ ते १० एप्रिल २०१९ पर्यंत राज्यात एक हजार दोनशे छत्तीस रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यांपैकी आठशे पंचेचाळीस रुग्ण संपूर्ण बरे झाले. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये अद्यापही दोनशे सत्तेचाळीस रुग्ण उपचार घेत आहेत.

राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, स्वाइन फ्लूचा विषाणू पसरण्यास सर्वाधिक पोषक काळ थंडीचा आहे हा सर्वसाधारण समज आहे. मात्र दिवसा कडक ऊन, पहाटे आणि रात्री गारठा असे विषम हवामान देखील स्वाइन फ्लूच्या वेगवान वाढीसाठी कारणीभूत ठरते. राज्यात उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवण्यास सुरवात झाली असली, तरी अनेक ठिकाणी रात्रीचे, सकाळचे तापमान आणि दिवसभराचे तापमान यात तफावत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्या अद्याप शून्यावर आलेली नाही. स्वाइन फ्लू सदृश लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचे स्थलांतर हा देखील चिंतेचा विषय आहे. त्यामुळे विषाणूचा प्रसार होण्याची प्रक्रिया सुरूच राहाते. हे टाळण्यासाठी विषाणूजन्य आजाराची प्राथमिक लक्षणे दिसल्यास तातडीने औषधोपचार घेणे तसेच संपूर्ण विश्रांती घेणे गरजेचे आहे.