जिल्ह्यात स्वाईन फ्लू ने थमान घातले असून ब्रह्मपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतनचे निदेशक देवराव जयराज येलमुले (४२) यांचा काल, मंगळवारी रात्री स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. सात दिवसात स्वाईन फ्लूने दोघांचा मृत्यू, तर दोन रुग्ण दाखल असून संशयित ५२ रुग्णांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविल्याने खळबळ उडाली आहे.

मूळचे गोंडपिंपरी तालुक्यातील एका छोटय़ा गावचे रहिवासी देवराव येलमुले हे ब्रह्मपुरी तंत्रनिकेतनमध्ये निदेशक होते. चार दिवसापूर्वी त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. पुण्याहून त्यांचे रक्ताचे सर्व नमुने तपासून आले असता त्यातही स्वाईन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले, पण उपचारादरम्यान काल, मंगळवारी रात्री १० वाजता मृत्यू झाला. येलमुले यांना स्वाईन फ्लू झाल्याची नोंद जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मुरंबीकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोगुलवार यांच्याकडे होती. मात्र, त्यांचा मृत्यू झाला, ही माहिती या दोन्ही शासकीय अधिकाऱ्यांना नव्हती.
आज दुपारी प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत दोन्ही अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत, मृत्यूची माहिती नाही, असे सांगण्यात आले. दरम्यान, स्वाईन फ्लूने जिल्ह्यात अक्षरश: थमान घातले असून सात दिवसात सावली येथील शिक्षक संतोष पगडपल्लीवार (४२) व देवराव येलमुले (४२) या दोघांचा मृत्यू, तर जिल्हा रुग्णालयात मूल येथील स्वाईन फ्लूचा एक रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाडे नावाचा रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ.मानवटकर यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयाला माहिती देण्यात आली, असेही ते म्हणाले.
राधा दागमवार हिलाही स्वाईन फ्लू झाला होता. उपचाराअंती तिला सुटी देण्यात आल्याचे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले. हा आजार जिल्ह्य़ात बळावत असतांनाच सावली व ब्रम्हपुरी येथे विशेष पथकाच्या माध्यमातून तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहे.
मृत संतोष पगडपल्लीवार यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, तसेच सावली परिसरातील सर्व गावांमध्ये मोहीम राबविण्यात येत असून तेथे १०० जणांना सर्दी, पडसा, खोकला, ताप व दम्याची लागण झाली असल्याची माहिती डॉ.मुरंबीकर यांनी दिली. यातील ४५ जणांमध्ये सर्दी व तापाचे प्रमाण अधिक दिसून आल्याने त्यांचा संशयित रुग्णात समावेश केला आहे. या सर्वाचे नमुने पुणे येथे तपासणीला पाठविण्यात आले आहे. ब्रह्मपुरी येथेही शिबिराच्या माध्यमातून तपासणी सुरू केली असून आतापर्यंत ३६८ लोकांची आरोग्य तपासणी केली. यात सात संशयित रुग्ण मिळाले आहेत. त्यांचेही नमूने पुणे येथे पाठविले आहेत.
दोन दिवसापूर्वीच ब्रह्मपुरीचे आमदार व विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत चिंता व्यक्त करताना ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली येथे २४ स्वाईन फ्लूचे रुग्ण मिळाल्याची माहिती पत्रकारांना दिली होती. आता तेथे आरोग्य कर्मचारी व परिचारिका तपासणी मोहीम राबवित आहेत. चंद्रपूर शहर व तालुक्यातही स्वाईन फ्लू रूग्ण आढळले असून शहरातील काही खासगी रुग्णालयात रूग्ण भरती असल्याची माहिती सूत्रांनी दिली. असे असले तरी जिल्हा व महापालिका प्रशासन याबाबत अजूनही अनभिज्ञ आहेत.
शहरातील रुग्णालयात स्वाईन फ्लूचा रुग्ण आहे किंवा नाही, याची नोंद घेण्याची जबाबदारी महापालिका आरोग्य विभागाची आहे, असे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुनघाटे यांनी सांगितले. मात्र, मनपाच्या आरोग्य विभाग प्रमुख डॉ.अंजली आंबटकर या संदर्भात नेमके काय करीत आहेत, हे त्यांचे त्यांनाही माहिती नाही. दरम्यान, स्वाईन फ्लूने घाबरण्याची गरज नाही. या आजाराची भीती कुणालाही वाटत असेल तर त्यांनी थेट जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन शल्यचिकित्सक डॉ.मुरंबीकर यांनी केले आहे.

मल्टी स्पेशालिटीकडून आजाराचा बाऊ
शहरातील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने या आजाराचा बाऊ केला असून हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना १२०० रुपयाचे इंजेक्शन देत आहेत. प्रत्यक्षात या आजारासाठी लागणारी सर्व औषधे या जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. खासगी डॉक्टरही जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून औषधे मागवितात. मात्र, काही मल्टी स्पेशालिटी रुग्णालयांनी इंजेक्शन देऊन फी वसुली सुरू केली आहे.