जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या संशयित ५ रुग्णांवर उपचार चालू असून एका रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर एकाचा निगेटिव्ह आहे. इतर तीन रुग्णांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती प्रभारी शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके यांनी दिली.
राज्यात ५२जणांचा स्वाइन फ्लूमूळे मृत्यू झाला. परभणीतही स्वाइन फ्लूची लागण झाली असून आतापर्यंत ५जणांवर उपचार चालू असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली. शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष, विशेष डॉक्टर, परिचारिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी सर्व औषधी व यंत्रसामग्री उपलब्ध आहे. परभणीप्रमाणे सेलू व गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयांतही स्वाइन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आजपर्यंत येथे एकही स्वाइन फ्लूचा रुग्ण दाखल झाला नाही, अशी माहिती डॉ. डाके यांनी दिली.
आठ दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या स्वाइन फ्लूच्या एका रुग्णाचा अहवाल तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. या रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यावर उपचार सुरूकेले आहेत. आता त्याची स्थिती उत्तम असून त्याच्या घरच्या ५जणांवरही आम्ही लक्ष ठेवून आहोत. इतर चारपकी एका रुग्णाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला, तर ३ रुग्णांचे तपासणी अहवाल अजून प्राप्त झाले नाहीत. मात्र, त्यांच्यावर स्वाइन फ्लूचे संशयीत रुग्ण म्हणून उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती डॉ. डाके यांनी दिली.
ताप, खोकला, घश्यात खवखव, डोके दुखणे, श्वास घेताना दम लागणे आदी बाबी आढळून आल्यास त्वरित जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, स्वच्छ हात धुवूनच जेवण घ्यावे. खोकला येत असेल तर रुमाल तोंडावर घ्यावा, असे डॉ. डाके म्हणाले.
लातूरमध्ये स्वाइन फ्लूचा सहावा बळी
वार्ताहर, लातूर
स्वाइन फ्लूची साथ वेगाने पसरत असून लातूर शहरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सहाव्या रुग्णाचा मृत्यू झाला.
रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करत आहेत. मात्र, दररोज नव्या रुग्णाची भर पडत आहे.
जिल्हाभर आरोग्य विभागातील यंत्रणेला स्वाइन फ्लूबाबत दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असून, प्रत्येकाला कृती कार्यक्रमही आखून देण्यात आला आहे. विविध प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबद्दल प्रबोधन करण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल सहाजणांचा बळी स्वाइन फ्लूने घेतल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. आजार अंगावर न काढता तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.