पश्चिम विदर्भात म्हणजेच अमरावती विभागात स्वाइन फ्लूचा विळखा अधिकच घट्ट होत चालला असून ४७ संशयित रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसात अमरावती, अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील तिघांचा स्वाइन फ्लूने बळी गेला. त्यामुळे या आजाराने विभागात बळी गेलेल्यांची संख्या दहावर पोहोचली आहे.
अमरावती विभागात आतापर्यंत २ हजार २५५ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४७ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याने आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. प्रयोगशाळेतून तपासणी अहवाल आल्यानंतर ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. सुमारे साडेसातशे रुग्णांवर टॅमी फ्लूचे उपचार सुरू आहेत. गेल्या आठवडय़ात अमरावती शहरातील सिद्धार्थनगरातील अनिता सिद्धार्थ श्रृंगारे (२८) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान, तर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील विजय राजाराम भोपळे (३२) यांचा अकोला येथील रुग्णालयात बळी गेला.
अनिता श्रृंगारे यांना गेल्या २८ फेब्रुवारीला डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण त्यांनी उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले, पण तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना चार वर्षांचा मुलगा आहे. जळगाव जामोदच्या विजय भोपळे यांना स्वाइन फ्लू झाल्याची लक्षणे आढळल्यानंतर गेल्या २३ फेब्रुवारीला अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
विभागातील जिल्हा रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत, पण रुग्णालयांमध्ये इतर रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना अधिक काळजी घ्यावी लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस आणि आभाळाने एन्फ्लूएन्झा एच-१, एन-१ विषाणूंना पोषक वातावरण निर्माण करून दिले आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर स्वाइन फ्लूचा प्रकोप कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, पण पावसापाठोपाठ आलेल्या गारव्याने संशयित रुग्णांच्या चिंतेत भर टाकली. आता दुपारी उन्हाचा तडाखा वाढला आहे, पण स्वाइन फ्लू आटोक्यात आलेला नाही. उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर या आजाराची तीव्रता कमी होईल, असे वैद्यक तज्ज्ञांचे मत आहे.
स्वाइन फ्लूचा फैलाव झपाटय़ाने होत असताना जनजागृतीचा मात्र अभाव दिसून येत आहे. ऐकीव माहितीच्या आधारे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून औषध विक्रेत्यांसाठी ही पर्वणी ठरली आहे. दहा रुपये किमतीत मिळणाऱ्या साध्या मास्कच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, निलगिरी तेलाची मागणी वाढल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाने मात्र स्वाइन फ्लूशी लढा देण्यासाठी सज्ज असल्याचा दावा केला आहे.
३१ मार्चपर्यंत कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्याला रजा देण्यात येऊ नये व रजेवर गेलेल्यांना परत बोलावण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी स्वाइन फ्लूचे सर्वेक्षण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. टॅमी फ्लू गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.