करोनाच्या संकटाशी राज्यासोबतच केंद्र सरकारचीही आरोग्य व्यवस्था दोन हात करत असताना म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजाराचं नवं संकट आरोग्य यंत्रणेसमोर उभं राहिलं आहे. म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजारामुळे आणि त्यावरच्या महागड्या उपचारांमुळे नागरिकांमध्ये देखील भितीचं वातावरण निर्माण झालेलं असताना महाराष्ट्र सरकराने या आजारावर राज्यात मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. मात्र, यामुळे आधीच करोनाशी लढा देणाऱ्या राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, या आजारावरच्या औषधांचा देखील तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

‘म्युकरमायकोसीस’च्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार!

राज्यात म्युकरमायकोसिसचे १५०० रुग्ण!

आज केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह सहा राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्युकरमायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीविषयी हर्ष वर्धन यांना माहिती दिली. “महाराष्ट्रात काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) आजाराचे सुमारे १५०० रुग्ण असून त्यात वाढ होताना दिसत आहे. कोरोना पश्चात रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकार शक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे या आजाराचे रुग्ण वाढताहेत. त्यावरील उपचारासाठीच्या इंजेक्शनची किंमत जास्त असून त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी या औषधावरील छापील एमआरपी कमी करावी. तसेच, या औषधाचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून द्यावा. ज्या कंपन्या त्याचे उत्पादन करतात त्यांना ते वाढविण्याचे निर्देश द्यावेत”, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.

राज्य सरकार मोहीम हाती घेणार!

दरम्यान, म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी आजाराविषयी नागरिकांमध्ये जाणीवजागृती होणे आवश्यक असून त्यासाठी राज्य शासन मोहिम हाती घेईल, केंद्रशासनाने देखील त्यामध्ये सहभागी होऊन जनजागृतीसाठी मोहीम घेण्याचे आवाहन यावेळी केले.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक असून याची बाधा झालेल्यांमध्ये जवळपास ३० टक्के मृत्युदर आहे.

 ‘एमआरआयद्वारे योग्य निदान

ही बुरशी शरीरात नाकातून डोळे, मेंदू अशी पसरली जाते. त्याचे निदान सिटीस्कॅन किंवा इतर चाचणीमध्ये होत नाही. ते एमआरआयमध्येच योग्यरितीने होते. प्रत्येक रुग्णाचे एमआरआय करणे गरजेचे आहे. एमआरआय करण्यासाठी साधारण एक तास लागतो आणि ही चाचणी महागही आहे. सध्या चाचण्या केंद्रांवर सिटीस्कॅनसाठीच एवढी गर्दी असते की एमआरआयसाठी वेळ देण्यास केंद्र तयार होत नाहीत. त्यामुळे पुढील काळात परिस्थिती आणखी आव्हानात्मक असेल, असे मत कान-नाक- घसातज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी व्यक्त केले.

म्युकरमायकोसिस लक्षणे

नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे