31 May 2020

News Flash

शासकीय रुग्णालयांना समस्यांची लागण

शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र हे अनेक साधनांनी अपुरे आहेत.

|| जगदीश तांडेल

उरण हे नवीमुंबईसह मुंबईचे एक उपनगर बनले आहे. असे असले तरी उरणमधील वाढत्या अपघातावर तसेच येथील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक त्या आरोग्य सुविधांपासून येथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वंचित राहिलेले आहेत. येथील शासकीय रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र हे अनेक साधनांनी अपुरे आहेत. त्यामुळे नागरिकांना उपचारा विनाच आपला जीव गमवावा लागत आहे. मागील अनेक महिन्यांपासून या रुग्णालयाच्या अत्यावश्यक रुग्णवाहिकेला चालक नाही, तसेच रक्तपेढी, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर न होणारे उपचार अशा अनेक असुविधांनी ग्रस्त असल्याने उरणमधील नागरिक त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे मागील दहा वर्षांपासून उरणमधील १०० खाटांचे शासकीय रुग्णालय वेटिंगवरच आहे.

उरण तालुक्यात जेएनपीटी, ओएनजीसीसारखे देशातील महत्त्वाचे प्रकल्प आहेत. तर मुंबई व नवी मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण शहरात आजही आरोग्य अ सुविधा आहेत. राज्य सरकारकडून शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तर उरण शहरात इंदिरा गांधी रुग्णालय आहे. तसेच कोप्रोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यातील कोप्रोली येथील आरोग्य केंद्र हे नेहमीच बंद असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. त्यामुळे रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याने रुग्णांचे जीव धोक्यात आले आहेत. उरणमधील वाढलेल्या वाहतुकीमुळे अपघातांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे उरणमध्ये रक्तपेढी, अतिदक्षता विभाग, ट्रॉमा सेंटर आदीची व्यवस्था करण्याच्या मागणीसाठी आंदोलनही झाली. तर दुसरीकडे तालुक्यातील डोंगरांचे सपाटीकरण करून ती नष्ट केली जात आहेत. त्यामुळे जंगलातील विषारी व बिनविषारी सापांचं स्थलांतर झाल्याने ते शहर आणि गावात येऊ लागले आहेत. त्यामुळे सर्प दंशाच्या संख्येत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने आपत्कालीन काळात रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत याकरिता १०८ क्रमांकाच्या रुग्णसेवेची सोय केलेली होती. मात्र ही सेवा सध्या निकामी होऊ लागली आहे. अनेक अपघातानंतर या क्रमांकाशी संपर्क साधल्यानंतर वेळेत रुग्णांना सेवा उपलब्ध होत नाही. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. तर दुसरीकडे रुग्णालयात आवश्यक असलेल्या नियमित रुग्णवाहिकाही वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना याचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना तर त्यांच्या राहत्या ठिकाणावरून आल्यावर रुग्णालयातच वैद्यकीय अधिकारी नसने, कोणत्याही प्रकारची औषधे उपलब्ध नसने यामुळे पायपीट करीत पुढील उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणावर जावे लागत आहे. अशा वेळी रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. तर आदीवासी भागातील अनेक रुग्ण हे रुग्णालयापर्यंत पोहचेपर्यंतच आपले प्राण गमावीत आहेत. पावसाळ्यात अशा रुग्णांना रुग्णालयापर्यंत आणणे कठीण होते. त्यानंतर त्याच्यावर उपचार घेतल्यानंतर त्याला घरी परत नेतानाही सोपे काम नसते अशा वेळी एखादी सामाजिक संस्था त्यांना मदत करते. त्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकतात. अनेक उपचारांसाठी शासनाकडून ज्या सुविधा दिल्या पाहिजे त्यांची यादी प्रत्येक रुग्णालयात लावली जाते मात्र त्या सुविधा उपलब्ध नसतात हाच अनुभव अनेकांना येतो. उरणमध्ये होत असलेल्या औद्योगिक गुतंवणुकीच्या व वाढत्या उद्योगांच्या तुलनेत ज्या प्रमाणात येथील वैद्यकीय व आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याची गरज होती. ती आत्तापर्यंत झालेली नाही. जेएनपीटी बंदराच्या कामगार वसाहतीत एक प्रशस्त असे रुग्णालय आहे. मात्र हे रुग्णालय ५० टक्क्यापेक्षा अधिक रिकामेच आहे. या रुग्णालयातून ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्याकरिता उपोषणेही करण्यात आलेली आहेत. तर दुसरीकडे शासनाकडून उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर १०० खाटांचे एक शासकीय रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया गेल्या पाच ते सहा वर्षांपासून सुरू आहे. ही प्रक्रिया सध्या निधीच्या अभावी रखडली आहे. त्यामुळे उरणमधील समस्या दूर करण्यासाठी कोण सरसावणार हाच प्रश्न आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 1:49 am

Web Title: symptoms problems government hospitals akp 94
Next Stories
1 सरकारी आरोग्य सेवाच अडगळीत
2 जव्हारचा ‘दरबारी दसरा’ उत्साहात साजरा
3 खासगी शाळांतील शिक्षकांवर निवडणूक कामांसाठी दबाव?
Just Now!
X