दलित बहुजन समाजाला रोजी-रोटीमध्ये व्यवस्थेने अडकवून ठेवले आहे. कुटुंबाच्या दैनंदिन गजरा भागविण्यासाठी त्याला सर्व ताकद पणाला लावावी लागते. मग उरलेल्या तो स्वत:ला घडवू पाहातो, असे प्रतिपादन येथील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवाडी साहित्य नगरीत आयोजित ११ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी केले.
प्रारंभी दक्षिण बजरंगी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. सकाळी साहित्य नगरीपासून फेरी काढण्यात आली. फेरीत डॉ. आंबेडकरांचे बुद्ध आणि धम्म, जोतिबा फुले यांचे गुलामगिरी, अण्णा भाऊ साठे यांचे समग्र निवडक वाड:मय आदी ग्रंथ ठेवण्यात आले होते.  बजरंगी यांनी जीवन आणि देशभरासाठी सडक नाटय़ चळवळ महत्वाची ठरल्याचे सांगितले. शासन सडक नाटय़ चळवळूीला परवानगी देत नाही. सडक नाटय़ चळवळीनेच आपल्या छारा जमातीचे दु:ख जगासमोर मांडले, असेही ते म्हणाले. स्वागताध्यक्ष अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी द्रोह आणि विद्रोह यात मोठे अंतर आणि फरक असल्याचे सांगितले. द्रोहाच्या ठायी सूडाची भावना तर विद्रोह हा परिवर्तनासाठी असतो असे त्यांनी नमूद केले. विद्रोह समाजाचा मित्र असतो. क्वचित प्रसंगी जुलूम, अत्याचार आणि अपमानाने प्रक्षुब्ध झालेला विद्रोह आक्रमक होतो. जो ज्वालामुखीचे रुप धारण करतो. परंतु त्याची ही अवस्था क्षणिक असते. तो त्याचा स्थायीभाव नसून तत्कालीन नैसर्गिक आणि सहज प्रतिक्रिया असते, असेही ते म्हणाले.  
कार्याध्यक्ष सिद्धार्थ जगदेव, संयोजक सुभाष काकुस्ते यांच्यासह किशोर ढमाले, संध्या नरे-पवार, प्रा. रणजित देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.