दुसऱ्या बछडय़ाचा शोध सुरूच

पांढरकवडय़ातील मृत ‘टी-१’ वाघिणीच्या मादी बछडय़ाला जेरबंद करण्यात वनखात्याच्या चमूला यश आले आहे. मध्य प्रदेश वनविभागाचे डॉ. अखिलेश मिश्रा यांनी मादी बछडय़ाला जेरबंद केले. नर बछडा मात्र अजूनही वनखात्याला सापडलेला नाही.

दोन्ही बछडय़ांना जेरबंद करण्यासाठी मध्यप्रदेश वनखात्यातील चार हत्ती आणण्यात आले होते. टी-वन वाघिणीच्या दोन्ही बछडय़ांना पकडण्यासाठी दोन नोव्हेंबरपासूनच मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत वनखात्याचा १०० जणांचा चमू आणि आठवडाभरापूर्वी मध्यप्रदेशातील कान्हाच्या जंगलातील चार हत्तींचा देखील समावेश करण्यात आला. जंगलाचा परिसर उंचसखल असल्यामुळे आणि झुडपे मोठी असल्यामुळे वाहन किंवा पायी गस्त घालून ही मोहीम राबवणे शक्य नव्हते.  त्यामुळेच वनखात्याने हत्तींची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता हा संपूर्ण परिसर जाळी लावून बंद करण्यात आला. या मोहिमेला आज शनिवारी यश आले. मादी बछडय़ाला डॉ. अखिलेश मिश्रा यांनी ‘ट्रॅक्विलायझिंग’बंदुकीच्या माध्यमातून बेशुद्ध केले. दुसऱ्या  बछडय़ालाही उद्या रविवारी जेरबंद करण्यात यश येईल, असा विश्वास अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी व्यक्त केला. दरम्यान, मादी बछडय़ाला पेंच व्याघ्रप्रकल्पात तयार करण्यात आलेल्या खुल्या पिंजऱ्यात सोडण्यात येणार आहे. नर बछडा जेरबंद झाल्यानंतर त्याला देखील येथे आणण्यात येणार आहे. शिकारीत तरबेज झाल्यानंतर त्यांना पुन्हा जंगलात सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल.