हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणारा कडेगाव येथील मोहरमनिमित्त ताबूत भेटीचा दिमाखदार सोहळा मंगळवारी हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडला. दोनशे वर्षांची परंपरा असणा-या या सोहळ्यातील गगनचुंबी ताबूत पाहण्यासाठी कर्नाटकातूनही भावीक आले होते. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासह काँग्रेस, भाजपासह सर्व पक्षाचे कार्यकत्रे मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
दुपारी १२ वाजता सातभाईचा मानाचा ताबूत उचलण्यात आला. त्यानंतर १२.३० वाजता बागवानांचा ताबूत सहभागी झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. दोन्ही ताबूत पटेल चौकात भेटीसाठी आले. यावेळी शेटे, अत्तार, देशपांडे हकीम तांबोळी यांचे ताबूत मिरवणुकीत सहभागी झाले.
ताबुतांची मिरवणुक सुरू झाल्यानंतर सर्वात उंच म्हणजे सुमारे दोनशे फूट उंचीचे शेख इनामदार यांचे ताबूत मिरवणुकीत सहभागी झाले. त्यानंतर देशमुख, शिंदे, देशपांडे शेटे व कुलकर्णी हे मानाचे मानकरी ताबुतांच्या मिरवणुकीत सहभागी झाले. चावडी चौकात शुक्रवार पेठ मेल आणि बुधवार पेठ मेल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाथपंथिय गीतांचे सामने सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची गीतेही सादर करण्यात आली.
ताबूत भेटीचा सोहळा पाहण्यासाठी कराडचे आ. बाळासाहेब पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख, मोहनराव कदम, विश्वजित कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, कडेगाव पंचायत समितीच्या सभापती श्रीमती लता महाडिक, उपसभापती विठ्ठल मुळीक, सरपंच विजय शिंदे, उपसरपंच अविनाश जाधव, सतीश देशमुख, नितीश कदम, चंद्रसेन देशमुख, गुलाम पाटील आदी राजकीय कार्यकर्त्यांसह प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार हेमंत निकम आदी उपस्थित होते.