बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पाणवठय़ांवर प्रगणकांना ३५ वाघांनी दर्शन दिले. २० बिबटय़ांसह अस्वल, हरण, चितळ, नीलगाय आदी वन्यप्राण्यांचीही प्रगणकांनी नोंद घेतली. दरम्यान, ताडोबा व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गोंधळ उडाल्याने प्रगणकांना त्रास सहन करावा लागला.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुधवारी रात्री बौद्ध पौर्णिमेच्या रात्री पाणवठय़ांवर येणाऱ्या प्राण्यांच्या गणना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेलिया तलावालगत गेल्या काही दिवसांपासून चार पिल्लांसह दिसणाऱ्या वाघिणीने बहुतांश प्रगणकांना दर्शन दिले. ताडोबा वनपरिक्षेत्रातील एकंदर ३५ वाघांची नोंद घेण्यात आली आहे, तर १५ ते २० बिबटय़ांनी प्रगणकांना दर्शन दिले, तर अस्वल, हरण, चितळ, निलगाव व अन्य वन्यप्राणी कृत्रिम पाणवठय़ावर आल्याचे प्रगणकांनी सांगितले. वाघ दिसल्याचा आनंद असला तरी ताडोबा व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रगणकांना बराच त्रास सहन करावा लागला. ताडोबा व्यवस्थापनाने सर्व प्रगणकांना सकाळी ८ वाजता वनराजीक महाविद्यालयात बोलावले होते, परंतु सकाळी १० वाजता अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कुठेही पत्ताच नव्हता. प्राणीगणनेला सकाळी १० वाजता सुरुवात होणार असल्याने ताडोबा व्यवस्थापनाने तशी व्यवस्था करायला हवी होती. प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे वनराजीक महाविद्यालयात एकत्र आलेले प्रगणक १० वाजेपर्यंत ताडोबा कोरचे कार्यालयात बसले होते. प्रगणकांची यादी असलेला कर्मचारी कार्यालयात हजर नव्हता. शेवटी ११ वाजता हा कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर दुपारी १२ वाजता सर्व प्रगणक ताडोबाच्या दिशेने रवाना झाले. प्रगणकांना ताडोबा, मोहर्ली व कोळसा या तीन परिक्षेत्रातील मचाणीपर्यंत सोडण्यातच सायंकाळचे चार ते पाच वाजून गेले. प्रगणकांसाठी जेवण व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही वनखात्याने केलेली नव्हती.
मचाण तुटले
मचाण तुटून अपघात झाल्याची साधी माहितीही ताडोबा व्यवस्थापनाकडे नाही. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ताडोबा कोरचे उपवनसंरक्षक एम. एस. कळसकर, सहायक उपवनसंरक्षक रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता ते कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होते.