ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातील तळोधी नाईक येथे मानद वन्यजीव सदस्य पूनम धनवटे यांच्या शेतातील पाणवठय़ालगत चितळाच्या शिकारीचे संशयास्पद प्रकरण उघडकीस आल्यानंतर बफर क्षेत्रात सायंकाळी ५ ते सकाळी ५ या वेळात प्रवेश निषिध्द करण्यात आलेला आहे. बळजबरीने प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रातील चितळ शिकार प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. मानद वन्यजीव सदस्य पूनम धनवटे यांच्या शेतातील पाणवठय़ाजवळच हे संशयास्पद चितळ प्रकरण उघडकीस आल्याने वनखात्यात खळबळ उडाली होती. प्राथमिक चौकशीअंती वनखात्याने धनवटे यांना ‘क्लिन चिट’ दिली आहे. मात्र, याच परिसरात पर्यटक व छायाचित्रकारांचा धुडगूस कायम बघायला मिळतो, अशीही तक्रार वन कर्मचाऱ्यांचीच आहे. खडसंगी व तळोधी नाईक परिसरातच नाही, तर ताडोबा बफर क्षेत्रातील तपासणी नाक्यातून पर्यटक व छायाचित्रकार बळजबरीने प्रवेश करत असल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. वन्यजीवांच्या दृष्टीने हा सर्व प्रकार हानीकारक असल्याने ताडोबा बफरचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवने यांनी बफरक्षेत्रात सायंकाळी ५ ते सकाळी ५ या वेळात प्रवेश निषिध्द केला आहे. जंगलात सायंकाळी ५ वाजतानंतर वाघ, बिबट व अन्य वन्यजीव आराम करतात. मात्र, याच वेळी बफरक्षेत्रात पर्यटक, छायाचित्रकार प्रवेश करून धुडगूस घालत असतात. काही दिवसांपूर्वी व्हॉट्अप व फेसबुकवर अशाच काही उत्साही छायाचित्रकारांचा एक व्हिडिओ आला होता. यात पहाटेच्या वेळी पर्यटक जंगलात धुडगूस घालत असल्याचे व वाघासमोर गाडी लावून त्याला त्रास देत स्पष्ट दिसत होते. या प्रकरणाचे वृत्त पिंट्र व इलेक्ट्रॉनिक मिडियात प्रसारित होताच ताडोबा व्यवस्थापन हादरले होते. त्यानंतर छायाचित्रकार व वन्यजीवप्रेमींना बफरच्या कार्यालयात बोलावून त्यांचे कॅमेरे व मोबाईल जप्त करून समज देण्यात आली होती.
या घटनेनंतरही अशाच प्रकारच्या काही घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळेच आता बफरक्षेत्रात सायंकाळी ५ ते सकाळी ५ प्रवेशबंदी लागू केली आहे. पर्यटक, नागरिक, वाहने व छायाचित्रकारांना या वेळात प्रवेश निषिध्द आहे. केवळ प्रवेशव्दाराचे, तपासणी नाक्याच्या आत असलेले गावातील स्थानिक नागरिक व त्यांची व्यक्तीगत वाहने यांनाच प्रवेश दिला जाईल. आज ताडोबा बफरक्षेत्रात ७९ गावे असून या सर्व गावकऱ्यांना प्रवेश सुरू राहणार आहे. रिसॉर्टस्, विश्रामगृह व होम स्टे येथे रात्रीचे आरक्षण असलेल्यांना पर्यटकांनाही पुरावा सादर केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. वनविभागाच्या मोहुर्ली विभागातील  अधिकारी व कर्मचारी, शासकीय वाहने, रुग्णवाहिकांना प्रवेश दिला जाईल. एखाद्याने बळजबरीने प्रवेश केला किंवा प्रवेशाचा प्रयत्नही केला, तर या व्यक्ती व वाहनावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. या आदेशाची तपासणी नाक्यावरील वन कर्मचाऱ्यानेही कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. बफरक्षेत्रातील धुडगूस कमी करण्यासाठीच वनखात्याने ही ठोस पावले उचलली आहेत.