News Flash

चंद्रपूर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांना शनिवारपासून ताडोबाची नि:शुल्क शैक्षणिक सहल घडणार

हमखास व्याघ्रदर्शनासाठी या प्रकल्पाला विदेशातील पर्यटकही भेट देतात.

.. तर हाच उपक्रम सर्वच व्याघ्र प्रकल्पांमध्ये राबवणार

या जिल्ह्य़ातील शालेय विद्यार्थ्यांंना व्याघ्र प्रकल्प व वनसंवर्धनाचे महत्व विशद करणे, तसेच वन्यजीव व वनसंवर्धनासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या जाणिवा अधिक समृध्द होण्याच्या दृष्टीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबरपासून जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांंना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात नि:शुल्क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. दरवर्षी साधारणत ६ हजार विद्यार्थ्यांँना याचा लाभ मिळेल. प्रायोगिक तत्वावरील हा उपक्रम येथे यशस्वी झाल्यावर हाच तो राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्पांमध्येही राबवण्यात येणार आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ करण्याच्या दृष्टीने वनखात्याची वाटचाल सुरू आहे.

हमखास व्याघ्रदर्शनासाठी या प्रकल्पाला विदेशातील पर्यटकही भेट देतात. या जिल्ह्य़ातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणे शक्य होत नाही, त्यामुळे विद्यार्थी या महत्वाच्या वन पर्यटनापासून वंचित राहतात. वास्तविक, या जिल्ह्य़ातील वनसंवर्धन व व्याघ्र संवर्धनामुळे वनाजवळ राहणारे गावकऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. शालेय विद्यार्थ्यांना व्याघ्र प्रकल्प, तसेच वनसंवर्धनाचे महत्व समजणे आवश्यक आहे.

या पाश्र्वभूमीवर प्रायोगिक तत्वावर प्रथमत: याच जिल्ह्य़ातील जिल्हा परिषदेच्या शाळा, आश्रमशाळा, अनाथाश्रमातील विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थ्यांना या व्याघ्र प्रकल्पात निशु:क शैक्षणिक सहल घडविण्याचा उपक्रम प्रकल्पाचे उपसंचालक कोअर कार्यालयामार्फत हाती घेण्यात आला आहे.

यात विद्यार्थ्यांना शाळेपासून आणण्या-नेण्याची सोय या प्रकल्पामार्फत करण्यात येणार असून दरवर्षी साधारण वर्ग ४ ते १० च्या ६ हजार विद्यार्थ्यांंना या सहलीचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ मधून बालकांच्या शैक्षणिक विकासात त्यांच्या पर्यावरण व वनविषयक जाणिवा समृध्द करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते.

याच संदेशाला अनुसरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या विद्यार्थ्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सहल घडवण्यासाठी मोदींच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सुरुवात करणार आहेत. वनसंवर्धन, संरक्षण, तसेच वनखात्याच्या लौकीकात भर घालण्याच्या दृष्टीने त्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम महत्वपूर्ण मानला जात आहे.

असा आहे ताडोबा प्रकल्प

ताडोबाचा राजा जरी वाघ असला तरी येथे ४५ जातींचे वन्यप्राणी व रात्रीच दिसणारे उदमांजर, चांदी अस्वल, उडणारी खार, राजमांजर ही ताडोबाची आकर्षणे आहेत. या प्रकल्पात ३ हत्ती असून प्रवेश करतांनाच त्यांचे दर्शन होते. अजगरासारखा विशालकाय सर्प कुठेही दिसू शकतो. येथे सुमारे २८३ जातींचे पक्षी व पक्ष्यांचा राजा गरूड तर कुठेही दिसतोच. त्याशिवाय, हळघा, कोतवाल, कवडे, वांचण नीळकंठ, वेडा राघू, घुबड, युरोपातून येणारे कैकर, श्रृंगी घुबड हे अगदी विश्रामगृहाच्या जवळही दिसतात. मत्स्य गरूड ताडोबा तलावात हमखास दिसतो. मोठी पानडुबी, काळा करकोचा, बॅलीओनची पानकोंबडीची नोंद मुंबईनंतर येथेच आहे. विविध जलपक्षी येथे दिसतात. हिवाळ्यात उत्तरेकडून कित्येक स्थलांतरित पक्षी ताडोबाच्या आश्रयाला येतात. त्याशिवाय, २६ प्रकारचे कोळी, २३ जातींचे मासे, डबाईड एक प्लॉय या दुर्मिळ जातीच्या फुलपाखरासह ९४ प्रकारची फुलपाखरे, संरक्षित वनात ६६ वृक्षांच्या प्रजाती, झुडपांच्या २३, तर वेलींच्या ११ जाती व बांबूसह २६ जातींचे गवत आहे. येथे कोणत्याही ऋतूत जाता येते, पण जानेवारी ते मे हा येथे जाण्याचा सर्वोत्तम काळ आहे. कारण, पानगळीमुळे जंगल विरळ झाल्याने वन्यजीव निरीक्षणाच्या संधी जास्त असतात. दरवर्षी होणाऱ्या व्याघ्रगणना व पाणवठा गणनेत देशविदेशातील हजारो वन्यजीव अभ्यासक व जंगलप्रेमी सहभागी होतात. त्यासाठी सुमारे १८५ मचाणी आहेत. चांदण्या रात्री मचाणींवर बसून वन्यप्राण्याची नोंद घेण्याची मजा वेगळीच असते. या प्रकल्पात १७५ गुंफोही आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:59 am

Web Title: tadoba free educational trip
Next Stories
1 विनोद तावडेंच्या ‘त्या’ बठकीला नुटा व ‘एसीयुएसएटी’ला निमंत्रणच नव्हते
2 सोलापुरात ‘उत्तरा’च्या पावसाने दिलासा
3 नाशिकच्या ‘प्रोजेक्ट बंधन’चा मेळघाटशी असाही ऋणानुबंध!
Just Now!
X