व्याघ्र प्रकल्पातील २० टक्के रस्ते पर्यटकांसाठी खुले करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानासुद्धा ताडोबातील केवळ २ टक्केच रस्ते वापरासाठी खुले केल्यामुळेच पर्यटकांची संख्या रोडावली असा तर्क आता काढला जात आहे. ताडोबा व्यवस्थापनाने याकडे वेळीच लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती असे वन्यजीव प्रेमींचे म्हणणे आहे.
देशभरातील व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले करावेत की करू नये या मुद्यावर अनेक पर्यावरणवादी संघटनांचे म्हणणे तसेच सरकारची भूमिका ऐकून घेतल्यानंतर गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पांमध्ये मर्यादीत पर्यटनाला मान्यता दिली होती. पर्यटकांसाठी प्रकल्पातील २० टक्के रस्ते खुले करण्यात यावेत, असे न्यायालयाने निकालात म्हटले होते. कोणते रस्ते सुरू करावेत व कोणते बंद ठेवावेत हे ठरविण्याचे अधिकार न्यायालयाने प्रकल्प व्यवस्थापनाला दिले होते. त्याचा आधार घेत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी केवळ १.९८ टक्के रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने २० टक्क्यांची मर्यादा दिली असल्याने आणखी जास्त रस्ते पर्यटकांसाठी सुरू करण्यात यावेत अशी मागणी ताडोबाच्या स्थानिक सल्लागार समितीने अधिकाऱ्यांकडे केली होती. यात वसंत बंधारा, काळा आंबा, काटेझरी व कोळशाकडे जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश करावा असे समितीचे मत होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. पर्यटकांसाठी रस्ते खुले करताना व्यवस्थापनाने बीट पद्धतीचा वापर केला. जंगलाची विभागणी बीटमध्ये करण्यात येते. त्यामुळे ही पद्धत वापरण्यात आली. यापेक्षा रस्त्यांची लांबी लक्षात घेऊन त्या प्रमाणात रस्ते खुले करावे असे समितीने सुचवले होते. त्याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्याचा फटका आता बसू लागला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ताडोबात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली असून ही संख्या आता ४५ हजारांवर आली आहे. गेल्या वर्षी १ लाखापेक्षा जास्त पर्यटक ताडोबात आले होते. पर्यटकांची संख्या घटल्यामुळे महसूल सुद्धा कमी झाला आहे.
या प्रकल्पात पर्यटकांकडून गोळा झालेला पैसा ताडोबा फाऊंडेशनमध्ये जमा होतो. यातून ताडोबाच्या बफरझोनमध्ये असलेल्या गावांना विकासासाठी निधी दिला जातो. पर्यटकांची संख्या कमी झाल्यामुळे आता या गावांना निधी सुद्धा कमी मिळणार आहे. पावसाळय़ात देशभरातील सर्व प्रकल्प बंद असतात. फक्त ताडोबा त्याला अपवाद आहे. पावसाळय़ात ताडोबातील २ मुख्य रस्त्यांवरून पर्यटकांना फिरता येते. याला योग्य प्रसिद्धी दिली नाही, असे वन्यजीव प्रेमींचे म्हणणे आहे.
गेल्या तीन वर्षांपासून ताडोबात कार्यरत असलेले सहायक वनसंरक्षक गिरीश वशिष्ठ यांना विचारणा केली असता त्यांनी पर्यटकांची संख्या कमी झाली असली तरी ताडोबात जाणाऱ्या वाहनांची संख्या तेवढीच असल्याचे सांगितले. बाहेरून येणारे पर्यटक स्वतंत्र वाहन वापरतात. त्यातील आसने अनेकदा रिकामी असतात. यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. रस्ते खुले करण्याची पद्धत योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.