जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ऐन हंगामात तीन महिन्यांपासून बंद असल्यानं इथल्या पर्यटनावर आधारित हजारो लोकांचा रोजगार बुडाला आहे. जवळपास ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे. परिणामी इथल्या पर्यटनावर ज्यांचा रोजगार अवलंबून आहे त्यांच्यावर आता उपासमारीची पाळी आली आहे. या लोकांना वाचवण्यासाठी शासनाने ताडोबा प्रकल्प तातडीने सुरू करावा, अशी मागणी येथील ‘होम स्टे असोसिएशन’ने मुख्यमंत्र्यांना केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात त्यांनी ताडोबा पर्यटनावर आधारित लोकांची व्यथा व्यक्त केली आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा सुगीचा हंगाम म्हणजे उन्हाळा. देश-विदेशातून लाखो पर्यटक इथे पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळं इथला छोटा-मोठा व्यवसाय बहरतो. हजारो हातांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. वर्षातील चार महिन्यांचा हा हंगाम येथील लोकांना वर्षभर जगण्याची कशीबशी सोय करतो. मात्र, यावेळी आलेल्या करोना संकटाने या लोकांच्या जगण्यावरच आघात केलाय. आधीच करोनाचे भयाण संकट आणि त्यात रोजगाराचा अभाव, यामुळं ताडोबावर आधारित लोक उघड्यावर आले.

राज्यात आता टाळेबंदी उठवण्यात आली. त्यामुळं ताडोबाचे पर्यटनही सुरू केल्यास मोठी मदत या लोकांना होऊ शकते. येथे अनेक छोटे होम स्टे आहेत. एका होम स्टेवर किमान चार स्थानिकांचे कुटुंब जगते. छोटे व्यवसायी, चहाटपरी, किराणा व्यवसायी, भाजीपाला विक्रेते, टुरिस्ट गाईड हे सारेच घटक केवळ पर्यटनावर आपली उपजीविका करतात. पण मागील तीन महिन्यांपासून त्यांच्या हातात एक पैसासुद्धा येऊ शकलेला नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प सुरू करावा. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे सर्व नियम काटेकोर पाळण्याची, स्वच्छता ठेवण्याची, फिजिकल डिस्टन्स पाळण्याची हमी इथल्या होम स्टे असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात दिली आहे.

या निवेदनाच्या प्रति पर्यटनमंत्री, पालकमंत्री विजय वडेट्टीवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, ताडोबा क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण या सगळ्यांना देण्यात आल्या असून, या निवेदनातून व्यक्त झालेल्या व्यथांचा संवेदनशील विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आज हे निवेदन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांना भेटून देण्यात आलं.