24 September 2020

News Flash

ताडोबा व्याघ्र पर्यटनाला टाळेबंदीचा फटका; पहिल्या दिवशी तुरळक पर्यटकांचा प्रतिसाद

टाळेबंदीत पर्यटन सुरू केल्याने जिल्ह्याबाहेरील पर्यटकांची पाठ

संग्रहीत छायाचित्र

करोनाच्या टाळेबंदीत सलग तीन महिन्यापासून बंद असलेला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये बुधवारपासून (१ जुलै) पर्यटनाला सुरूवात झाली. या काळात दरवर्षी हाऊसफुल्ल राहणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बफर झोनच्या १३ प्रवेशव्दारांतून सकाळी ५ आणि सायंकाळी ७ जिप्सींमधून दिवसभरात केवळ २२ पर्यटकांनी प्रवेश केला. टाळेबंदीमुळे ई-पासशिवाय बाहेरील जिल्ह्यातील पर्यटकांना प्रवेश मिळत नसल्याने पहिल्या दिवशी पर्यटकांचा थंड प्रतिसाद होता. त्यामुळे जिप्सी चालकांमध्ये निराशाचे वातावरण आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी बैठक घेवून १ जुलैपासून बफर झोनच्या १३ प्रवेशव्दारावरून पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. करोनाच्या टाळेबंदीत ताडोबा प्रशासनाने ऑनलाईन पध्दतीने पर्यटकांना व्याघ्र दर्शन करून देण्यात येत होते. ताडोबा व्यवस्थापनाने थेट बुकींगसह पर्यटकांना बफर झोनमधील १३ प्रवेशव्दारातून देण्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतरही पर्यटकांचा थंड प्रतिसाद होता.

दरवर्षी हाऊसफुल्ल असणारा ताडोबा प्रकल्प यंदा पर्यटनाच्या हंगामाच्या सुरूवातीला सकाळी पाच जिप्सींमधून पर्यटकांनी प्रवेश केला. यामध्ये आगरझरी प्रवेशव्दारावर ३ तर कोलारा प्रवेशव्दारावर २ जिप्सींमधून पर्यटक गेले. तर दुपारी आगरझरी प्रवेशव्दारातून ४, अलीझंझा देवडा व मदनापूरमधून प्रत्येकी १ जिप्सीने प्रवेश केला. तर कोलारा, जुनोना, ममला, पांगडी, झरी, डोणी, सिरकडा, मदनापूर, नावेगाव आणि रामदेगी या १० प्रवेशव्दाराने एकाही जिप्सीचे बुकींग नव्हते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हमखास व्याघ्रदर्शनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे.

मात्र, जगावर करोनाचे मोठे संकट असल्याने देश-विदेशातील पर्यटक ताडोबात येऊ शकत नाहीत. ई-पासमुळे बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील पर्यटकांना अनेक अडचणी आहेत. तसेच जिप्सीचे सॅनिटायझेशन, मास्क बंधनकारक आहे. प्रवाशांना सर्दी, ताप, खोकला व इतर आजार नको. बाधितांची संख्या वाढत आहे, अशा स्थितीत पर्यटन सुरू केल्याने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. पूर्वी ताडोबा हाऊसफुल्ल असायचा, आज पर्यटक नाही. ताडोबा प्रकल्पात सफारीसाठी अनेकांना बुकींग गेल्यानंतर महिना ते दोन महिन्यांचा कालावधी लागत होता. तसेच अनेकांना बुकींग सुद्धा मिळत नव्हते. बुकींग हाऊसफुल्ल होत होत्या. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे ताडोबा पर्यटनाला सुध्दा मोठा फटका बसला असून जिप्सी चालक, गाईड, रिर्साट चालक यांच्यासह ताडोबा व्यवस्थापनाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टाळेबंदीत एक हजार रूपये प्रवेश शुल्क

ताडोबा बफर झोनसाठी एक हजार रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तर प्रत्येक गेटमधून जिप्सी शुल्क २,२०० रुपये आणि गाईड शुल्क ३५० रूपये असणार आहे. प्रत्येक गेटमधून सकाळ व दुपारी प्रत्येकी सहा अशा किमान १२ वाहनांना परवानगी दिली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 9:28 pm

Web Title: tadoba tiger tourism hit by lockout rare tourist response on the first day aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाबाधितांसाठी खासगी रुग्णवाहिका, वाहने ताब्यात घेणार; राज्य शासनाचा निर्णय
2 अकोल्यात करोना मृत्यू व रुग्णवाढीचे सत्र कायम
3 स्मार्ट सिटीच्या आरोपांवर आयुक्त तुकाराम मुंढेंनी सोडलं मौन; म्हणाले…
Just Now!
X