मदर डेअरी व अन्य कंपन्यांनी दूध संकलन करण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई करतांनाच आपल्याला थेट कळवावे, असे निर्देश पशूसंवर्धनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी आज दिले.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देवून पालकमंत्री सुनील केदार यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा घेतला. दूध उत्पादनात अग्रेसर असलेल्या कारंजा परिसरात दूध संकलनाबाबत तक्रारी असल्याची माहिती मिळाल्यावर पालकमंत्री केदार यांनी बैठकीत हा मुद्दा अग्रभागी ठेवला. दूध संकलन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या दूध डेअरीवर कडक कारवाई करावी. दिनशॉ आणि मदर डेअरी यांचे दुध संकलन केंद्र बंद असल्यास थेट मला कळवावे. तसेच दुधाला शासन दराने भाव मिळतो अथवा नाही याची तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी न राहण्याची खबरदारी घेण्याचे त्यांनी सांगितले. शिधापत्रिका असलेल्या अथवा तांत्रिक कारणास्तव मंजूरी नसलेल्या व्यक्तींना धान्य मिळावे. त्यांची तात्काळ यादी तयार करावी. गावनिहाय शिधा पत्रिकाधारकांची संख्या, शिधा मिळणारे व न मिळणारे, मिळण्यास अपात्र असणारे, अशी यादी दोन दिवसांत तयार करावी. या काळात ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत यांच्याकडे वीज देयके भरण्यास निधी नसल्यास पाणी पुरवठा योजनेची जोडणी कापू नये. जिल्ह्यातील कृषीसेवा केंद्र सुरळीत चालावी. गॅस सिलेंडर २४ तासात घरपोच द्यावे. औषधांचा पूरेसा साठा करावा, असेही त्यांनी निर्देश दिले.

जिल्ह्यात एकही करोनाबाधीत रूग्ण नसल्याबद्दल समाधान व्यक्त करतांनाच त्यांनी आरोग्य विभागाच्या डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतूक केले. खासगी डॉक्टर रुग्णालयं बंद करून बसलेले असतांना आरोग्य खाते सैनिकासारखे खिंड लढवत असल्याबद्दल त्यांनी सर्वाचे कौतूकही केले.