पारनेर : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणावर निर्बंध लागू असतानाही पारनेर तालुक्यात अवैध मद्यविक्रीसह इतर अवैध व्यवसाय अनिर्बंधपणे सुरू आहेत. पारनेर व सुपे पोलिसांच्या हेतूपुरस्सर दुर्लक्षामुळे सुरू असलेले अवैध व्यवसायांवर कारवाई करावी. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मक्लेष आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्मने यांनी निवेदन स्वीकारले. सतीश म्हस्के यावेळी उपस्थित होते.

पारनेर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांमार्फत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांपासून करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या र्निबधांची अंमलबजावणी केवळ सर्वसामान्य नागरिक, किराणा दुकानदार, भाजी, फळे, दूध, अंडी विक्रेत्यांवर जाचक पध्दतीने केली जात आहे. करोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ते आवश्यक आहे. मात्र दुसरीकडे पारनेर व सुपे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर सुरू आहेत. दारु, गांजा, गुटखा, मावा सहजपणे उपलब्ध होत आहे. तालुक्यात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. मुळा, कुकडी, हंगा नदीपात्रासह इतर नद्या, नाल्यांमधून सुमारे २५० ते ३०० गाडय़ांमधून अहोरात्र वाळू उपसा सुरू आहे. वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे, असे गंभीर आरोप वसिम राजे यांनी निवेदनात केले आहे.