News Flash

‘ओबीसी शिष्यवृत्तीबाबतचा निर्णय अधिवेशनापूर्वीच घ्या’

ओबीसी शिष्यवृत्तीच्या मुद्दय़ावर या भागातील जनमत तीव्र होऊ लागल्याने हिवाळी अधिवेशनाच्या आधीच म्हणजे ९ डिसेंबरपूर्वीच या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्या,

| December 3, 2013 01:26 am

ओबीसी शिष्यवृत्तीच्या मुद्दय़ावर या भागातील जनमत तीव्र होऊ लागल्याने हिवाळी अधिवेशनाच्या आधीच म्हणजे ९ डिसेंबरपूर्वीच या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्या, असा आग्रह विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे.
आर्थिक अडचणीचे कारण देऊन राज्यातील आघाडी सरकारने ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली शैक्षणिक शिष्यवृत्तीची सवलत बंद करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेतला. यावरून गेल्या काही महिन्यांपासून विदर्भात मोठे वादळ उठले आहे. राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत होता. केंद्राकडून वेळेवर निधी मिळत नाही, असे कारण देऊन सरकारने या शिष्यवृत्तीचा फेरआढावा घेण्याच्या निमित्ताने ही सवलतच बंद करण्याचा घाट घातला आहे. ही सवलत मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विदर्भात सर्वाधिक आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध संघटनांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन एक महिन्यापूर्वी विदर्भातील काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली होती. चव्हाण यांनी त्याला सकारात्मक प्रतिसादसुद्धा दिला होता. प्रत्यक्षात पुढे काहीही घडले नाही.
आता हिवाळी अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर या आंदोलनाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. काल रविवारी विविध संघटनांनी विदर्भातील आमदार व खासदारांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन केले.
या आंदोलनामुळे अनेक आमदार दिवसभर घरातच अडकून पडले. विदर्भातील मंत्र्यांच्या घरासमोरसुद्धा आंदोलन झाले. राज्याचे सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे या आंदोलनाला समोर गेले नाही. सरकारी पातळीवर या आंदोलनाची साधी दखलही घेतली जात नसल्याने विदर्भातील काँग्रेसच्या आमदारांमध्येसुद्धा नाराजीची भावना आहे. चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी या मुद्दय़ावर सभागृह बंद पाडू, असा जाहीर इशारासुद्धा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर आता विदर्भातील पक्षाच्या २३ आमदारांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून हिवाळी अधिवेशनाआधीच या मुद्दय़ावर निर्णय घ्या, असा आग्रह धरला आहे. या भागातील आंदोलनामुळे मतदारसंघात फिरणेसुद्धा मुश्कील झाले आहे. हा प्रश्न विद्यार्थ्यांशी निगडित असल्याने अनेकांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे अधिवेशनात विरोधी पक्षांकडून यावर गोंधळ होऊ शकतो. ही स्थिती टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा व हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला या संदर्भात सकारात्मक घोषणा करावी, अशी मागणी आमदारांनी केली आहे. येत्या ९ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्या आधीच मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, असे आमदारांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:26 am

Web Title: take decision on obc students scholarship before election says congress legislative
Next Stories
1 हजारेंचे आंदोलन जनतंत्र मोर्चाच्या झेंडय़ाखाली
2 विजय पांढरे आम आदमी पक्षात
3 सांगलीतील प्रस्तावित वन अकादमीवरून वादाची शक्यता
Just Now!
X