दुष्काळावर नुसती वक्तव्य करत बसण्यापेक्षा उपाययोजना करा, असा सल्ला देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या शेतकऱयांवरील वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला.
दुष्काळाच्या काळात एकनाथ खडसे यांनी असे विधान करायला नको होते. आणि अशा प्रकराची वक्तव्य कोणीही करु नयेत, असेही राज ठाकरे पुढे म्हणाले. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यावर दुष्काळाचे संकट कोसळले असताना शेतकऱयांची मोबाईल बिलं आणि वीज बिलं काढण्याची ही काही वेळ नाही, असेही राज म्हणाले. दुष्काळाच्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील भांडणं नेहमीचीच आहेत, असा सर्वपक्षीय नेत्यांवर निशाणा साधत राज यांनी आता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा दुष्काळामुळे हवालदील झालेल्या शेतकऱयाच्या मदतीसाठी वेळ खर्ची घाला, असे म्हटले.
मोबाईलचं बिल भरता मग विजेचं का नाही? असा बोचरा सवाल एकनाथ खडसे यांनी शेतकऱयांना विचारला होता. त्यामुळे खडसे हे विरोधकांच्या निशाण्यावर आहेत.