काँग्रेसचे डॉ. सुजय विखे यांचे राष्ट्रवादीला आव्हान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उमेदवार असू शकतो, मात्र तो सक्षम असावा, हवे असल्यास आपण व राष्ट्रवादीचा इच्छुक उमेदवार यांच्याबाबत सर्वेक्षण करावे, सर्वेक्षणातून जे नाव पुढे येईल, त्याला उमेदवारी द्यावी, फक्त हे सर्वेक्षण घरी बसून व्हायला नको, कारण मी गेल्या तीन वर्षांपासून मतदारसंघात फिरतो आहे, उमेदवार लोकांमधील असावा, असे आव्हान काँग्रेसचे बंडखोर युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी दिले आहे.

डॉ. सुजय विखे आज, शनिवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, तसेच विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अधिक मते होती, असा दावा करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या जागेवर हक्क सांगितला आहे, याकडे लक्ष वेधले असता डॉ. विखे म्हणाले की, म्हणूनच निवडणूकपूर्व सर्वेक्षण राष्ट्रवादीने करावे, गेल्यावेळच्या निवडणुकीपेक्षा मतदारसंघातील परिस्थितीत खूपच बदल झाला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची पत्नी आता भाजपची आमदार आहे. त्यांची मतेही राष्ट्रवादी गृहित धरणार का?

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत जागा काँग्रेसला न सुटल्यास आपण निवडणूक लढवणारच याचा पुनरुच्चार करून डॉ. विखे म्हणाले की, आपण गेल्या तीन वर्षांपासून निवडणुकीची तयारी करत आहोत. मी काही वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणूक लढवणार नाही तर लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठीच निवडणुकीत उतरणार आहे. माझे वडील व आई काँग्रेसमध्ये असले तरी त्यांना मी प्रचारात कोठेही आणलेले नाही, मतदार काही राजकीय घराणे पाहून उमेदवारांना स्वीकारत नाहीत. वडिलांनाही मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असे सांगितले आहे. आपण साकळाई योजनेच्या मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांच्याशी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. मात्र भाजप किंवा राष्ट्रवादीने मला उमेदवारी करण्याची ‘ऑफर’ दिलेली नाही. भाजपकडे गेल्या तीन वेळा विजयी झालेला सक्षम उमेदवार असताना ते मला कशासाठी ऑफर देतील? भाजप तरी विद्यमान खासदाराला का उमेदवारी नाकारेल? त्यामुळेच आपल्यापुढे मोठे आव्हान आहे, म्हणूनच मी मतदारसंघात खूप पळतो आहे, असे डॉ. विखे म्हणाले.

नगरमध्ये दहशत कोणाची? डॉ. विखे यांचे मौन

नगर दहशतमुक्त करण्यासाठी आपल्याला निवडणूक लढवायची आहे, आपण या दहशतीचा बंदोबस्त करु, असे डॉ. सुजय विखे म्हणाले. मात्र दहशत कोणाची आहे, व्यक्तीची की राजकीय नेत्यांची, पक्षाची? या प्रश्नाला त्यांनी गुळमुळीत उत्तर दिले. ते म्हणाले लोक म्हणतात येथे दहशत आहे, मात्र लोकच कोणाचे नाव घेत नाही, त्यामुळे आपल्याला कोणाची दहशत आहे, हे सांगता येणार नाही, उमेदवारी जाहीर केल्यावर आपण ते नाव सांगू. एमआयडीसी दहशतमुक्त झाली की नगर शहरही आपोआप दहशतमुक्त होईल, असा दावा त्यांनी केला. एमआयडीसीमध्ये काम करु दिले जात नाही, मारहाण होते, असे सांगत उद्योजकच नगरमधून पळून जात आहेत, एमआयडीसीत गुंडागर्दी चालते, दडपशाही चालते अशा तक्रारी असल्याचा दावाही डॉ. विखे यांनी केला. नगरच्या विकासासाठी औद्योगिक सुरक्षितता हवी असल्याने आपण त्याचा बंदोबस्त करु, असे ते म्हणाले. उद्योजक भयमुक्त झाल्याशिवाय देव जरी खाली उतरला तरी नगरचा विकास करु शकणार नाही, असेही वक्तव्य त्यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take pre poll surveys then decide the candidate
First published on: 17-02-2019 at 01:33 IST