विधान परिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित १२ जागा भरण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी दरम्यान सूत्र निश्चित झाल्याचे समोर आल्यानंतर या जागा भरताना घटनाकारांना अपेक्षित होते ते पाळले जाणार काय, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. साहित्य, विज्ञान, कला आदी क्षेत्रांतील नामवंत-अनुभवी व्यक्तींचा या दृष्टीने विचार व्हावा, अशी सूचना सहकार क्षेत्रातील साहित्यप्रेमी कार्यकर्ते भगवानराव भिलवंडे यांनी येथे केली.
भारतीय घटनेतील कलम १७१ (५) अन्वये राज्यपालांना विधान परिषदेवर १२ सदस्य नामनिर्देशित करता येतात. यापूर्वीच्या १२ सदस्यांची मुदत गेल्या मार्चमध्ये संपली. नव्या सदस्यांची नावे निश्चितीची प्रक्रिया काँग्रेस-राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षांच्या पातळीवर सुरू झाली आहे. काही वर्षे राज्य साहित्य संस्कृती मंडळावर राहिलेल्या भिलवंडे यांनी साहित्य-कला क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींचा विचार झाला पाहिजे, असे सुचविले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समर्थनार्थ साहित्य, कला, नाटय़ क्षेत्रांतील नामवंतांनी पत्रक काढून चव्हाण यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. त्यात फ. मुं. शिंदे, प्रा. दत्ता भगत, चंद्रकांत कुलकर्णी, ना. धों. महानोर, गिरीश गांधी, प्रशांत दळवी आदींचा समावेश होता.
राज्यात काँग्रेसचा धुव्वा उडाला, मात्र चव्हाण यांनी नांदेडचा गड सुरक्षित राखला. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात र्सवकष सांस्कृतिक धोरण आणले. राज्यपालनियुक्त १२ जागा भरताना चव्हाण यांनी विधान परिषदेसाठी एखाद्या लेखक-कवीच्या नावाचा आग्रह धरावा, अशी अपेक्षा नांदेडच्या साहित्य-कला क्षेत्रातून व्यक्त होत आहे. तथापि काँग्रेसकडून जी नावे चर्चेत आहेत, ती राजकीय पाश्र्वभूमी असलेली आहेत. चव्हाण यांनी नांदेडबाहेरील दोन नावांची शिफारस केल्याचे, तसेच ही दोन्ही नावे राजकीय क्षेत्रातील असल्याचे समोर आले आहे.
साहित्य संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल, असे त्यांच्या चाहत्यांना वाटते. पण राज्याच्या जाणत्या नेत्यासह काँग्रेस नेत्यांनी त्यांना हुलकावणी दिली. यशवंतराव चव्हाण यांनी ना. धों. महानोर यांना संधी दिली होती. नंतर शरद पवार यांनीही महानोरांना पुन्हा विधान परिषदेवर घेतले. हा अपवाद सोडल्यास मराठवाडय़ातून एकाही साहित्यिकाच्या वाटय़ाला आमदारकी आली नाही. खुद्द पवार यांनी काही वर्षांपूर्वी औरंगाबाद साहित्य संमेलनात फ. मुं.संदर्भात संकेत दिले होते. पण नंतर त्यांच्या पक्षाने मराठवाडय़ातून फौजिया खान, वसंत बळवंतराव चव्हाण यांना राजकीय तडजोडीतून संधी दिली. या पाश्र्वभूमीवर फ. मुं. शिंदे फार आशावादी नाहीत. प्रा. दत्ता भगत यांचा सूरही तसाच होता. दरम्यान, या नियुक्त्यांना राजकारणाची बाधा झाल्याने साहित्यिक, कलावंत किंवा विज्ञान क्षेत्रातील नामवंतांपैकी कोणाला संधी मिळू शकते हे लोक विसरून गेले आहेत, अशी मार्मिक प्रतिक्रिया प्रा. भगत यांनी व्यक्त केली.