खोतकरांना  ‘कॉम्पन्सेशन’?

निवडणुकीत देवाण-घेवाण होतच असते. दिले-घेतले नाही तर कसे चालेल? हे मतदारांनाही माहीत असते आणि नेत्यांनाही. दोन नेत्यांचे वाद असतील तर ‘कॉम्पन्सेशन’ वाढते. आता हा ‘कॉम्पन्सेशन’ शब्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा. झाले असे की, रावसाहेबांवर रुसलेल्या खोतकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमक्ष जालना जिल्ह्य़ात भाजपच्या काळात आणीबाणी होती, असे जाहीरपणे सांगितले. आता ही आणीबाणी नक्की कोणावर आणि कोणी लादली होती, याचा काही खुलासा झालेला नाही. कोणी कोणाची गळचेपी केली, कोणी कोणाला बोलू दिले नाही, हे काही कळाले नाही. पण नेत्यांच्या मध्यस्थीने आणीबाणी उठल्याचे खोतकरांनी जाहीर केले. कट्टरशिवसैनिक म्हणून युतीसाठी काम करणारे, असे त्यांनी जाहीर केले. खोतकरांच्या भाषणानंतर रावसाहेब दानवेही बोलण्यास उभे राहिले. प्रदेशाध्यक्षाच्या भूमिकेतून काही वेळ त्यांनी गंभीरपणे भाषण केले आणि मग खोतकरांच्या भाषणातील धागा पकडून ते म्हणाले, ‘अर्जुनराव म्हणाले, आणीबाणी उठली आहे. आता आपल्या सरकारने आणीबाणीत झळ पोहोचलेल्या कार्यकर्त्यांनी ‘कॉम्पन्सेशन’ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ज्या कोणाला झळ पोहोचलेली असेल त्याचे ‘कॉम्पन्सेशन’ दिले जाईल.’ त्यांच्या या वक्तव्याचे अर्थ काढले जात आहेत. झळ लागलेल्या व्यक्ती कोण आणि कोणत्या संस्था अशी विचारणा आता होऊ लागली आहे. खोतकरांच्या गटात रावसाहेबांच्या ‘कॉम्पन्सेशन’ची चर्चा सुरू झाली आहे. या नुकसानभरपाईमुळेच खोतकरांनी माघार तर घेतली नाही ना, अशीही कुजबुज सुरू झाली आहे.

पुडय़ा, नाडय़ांसह प्रचार कार्यालयासमोर गाय-वासरू

औरंगाबादच्या (नव्हे नव्हे संभाजीनगरच्या) खासदाराच्या हातात मनगटाच्या वर दैवी गंडेदोरे बांधलेले असतात. त्यातच शिवबंधन धागाही असतो. भाळी अष्टगंध लावल्याशिवाय ते बाहेर पडत नाही. अलीकडेच त्यांनी अंगारा लावून रोग बरा करण्याची शक्ती आपल्याकडे असल्याचा अजब दावा केला होता. प्रमोद महाजनांना अतिदक्षता विभागात ठेवले होते तेव्हा तेथे जाता आले असते आणि पुडी देता आली असती तर ते वाचले असते, असा त्यांचा दावा होता. सश्रद्ध खासदार दर वेळी प्रचार कार्यालयाच्या बाजूला गाय-वासरू आवर्जून बांधतात. असे का, याचे उत्तर त्यांना कोणी विचारत नाही. ते कोणाला सांगत नाही. पण गाय-वासरू शुभ असते, असे त्यांचे समर्थक सांगतात. गाय-वासरू शुभ असेल तर दुष्काळात होरपळणाऱ्या आणि चारा छावणीचे प्रस्ताव देऊनही ते मंजूर न झाल्याबद्दल नेत्यांनी लक्ष घातले असते. पण आपल्या दारातली गाय-वासरू महत्त्वाची असाच प्रचार कार्यालयातून मिळणारा संदेश आहे.

मुंबईवाला