खुर्चीचा खेळ

सारे काही खुर्चीसाठी, हे राजकारणाचे सूत्र. खुर्ची प्रेम कसं करावं हे औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांना विचारा. सोमवारचा दिवस उजाडला आणि काँग्रेसचा राजीनामा दिलेले सत्तार यांच्या लक्षात आले की जिल्हा काँग्रेस भवनात आपण ३०० प्लास्टिकच्या खुर्च्या घेतल्या होत्या. आता पक्षाचा राजीनामा दिला असल्याने त्या खुर्च्या आणायला हव्यात. भाजप नेत्यांच्या भेटीनंतर त्यांनीही कार्यकर्त्यांना आदेश दिले. त्या खुर्च्या आणा आपल्या कार्यालयात. अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असणाऱ्या सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी मग खुर्च्या आणल्या आणि बांधाकामाधिन नव्या संपर्क कार्यालयात मांडल्या.  मी माझ्या पैशांनी त्या खुच्र्या आणल्या होत्या. त्या परत आणल्या. आता ज्यांना निवडणूक लढवायची आहे, त्यांनी नव्याने खुर्च्या आणाव्यात. तरीही मी काँग्रेस कार्यालयात ध्वनीक्षेपक आणि इतर व्यवस्था जशास तशा ठेवली. सोमवारी काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड कार्यकर्त्यांंची बठक घेणार होते. खुर्च्या उचलून नेल्याने त्यांना राष्ट्रवादी भवनाचा बैठकीसाठी आसरा घ्यावा लागला. सत्तार यांनी खुर्च्याची पळवापळव करुन नवाच पायंडा पाडला आहे. त्यामुळे खुर्चीच्या खेळात कोणाचाही भरवसा नसतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

अवघड दुखणे

मुख्यमंत्र्यांचे कुटुंबिय हे किती नाजूक दुखणे असते हे सध्या तेलंगणातील सरकारी यंत्रणा अनुभवते आहे. चार महिन्यांपूर्वी झालेल्या तेलंगणातील शेतकऱ्यांनी भरभरून पाठिंबा दिल्याने सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीला तीन चतुर्थाश एवढे यश मिळाले. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व १७ जागा जिंकण्याचे चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न आहे. पण कन्या कविता यांच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात झालेल्या उमेदवारी अर्जामुळे चंद्रशेखर राव आणि सारी सरकारी यंत्रणा हैराण झाली आहे. निझामाबाद मतदारसंघात कविता यांच्या विरोधात २४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हळद आणि ज्वारीला योग्य भाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या सुमारे २०० शेतकऱ्यांनी निषेध म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एवढे उमेदवार रिंगणात राहिल्यास मतदानयंत्राच्या आधारे मतदान घेता येणार नाही. कारण ९६ उमेदवारांची नावे मतदानयंत्रांवर राहू शकतात. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवापर्यंत असून, अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे म्हणून साम, दाम, दंड, भेद या साऱ्यांचा वापर केला जात आहे.

प्रचार सुरू; पण वेळेचे काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वक्तशीरपणाबद्दल ख्याती आहे. आजोबा आणि वडिलांचा हा गुण आत्मसात करणे पार्थ यांना मात्र जमलेले नाही. निवडणूक प्रचारात बहुतांश ठिकाणी पार्थ नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचत असल्याने प्रचारात असणारे राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची चिडचिड होत आहे.  ज्या पद्धतीने, पार्थ यांचे दैनंदिन कार्यक्रमांचे नियोजन तयार केले जाते, त्यानुसार वेळा निश्चित केल्या जातात. प्रत्यक्षात त्याचे पालन होत नाही. त्यामुळे सगळाच गोंधळ उडत आहे. पार्थचे दौरे कळवले जात नाहीत. कार्यक्रम अचानक बदलले जातात. त्यामुळे सर्वाचीच तारांबळ उडते.

आकडे मोड

महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर सुरुवातीपासूनच काँग्रेसचे प्राबल्य राहीले आहे. गेल्या काही वर्षांत भाजप-शिवसेने काँग्रेसपुढे आव्हान उभे केले आहे.

१९५१

एकूण जागा – ४५ (मुंबई प्रांत)

काँग्रेस – ४०, अपक्ष – ३ , शेकाप -१

शेडय़ूल कास्ट फेडरेशन – १

५०.१५ टक्के काँग्रेसला मिळालेली मते

१९५७

एकूण जागा – ५८

काँग्रेस – ३८, अपक्ष – ८, शेकाप – ४

भारतीय जनसंघ – २

भारतीय कम्युनिस्ट पक्ष – ४

शेडय़ूल कास्ट फेडरेशन – ५

प्रजा समाजवादी – ५

काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी – ४८.६६ टक्के