News Flash

Taliye landslide : अश्रू थिजले अन् परतीची आशाही मावळली; ग्रामस्थांच्या विनवणीनंतर तळीयेतील शोध कार्य थांबवलं

ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या ३१ जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे.

Taliye landslide : अश्रू थिजले अन् परतीची आशाही मावळली; ग्रामस्थांच्या विनवणीनंतर तळीयेतील शोध कार्य थांबवलं

पावसाने धो धो कोसळायला सुरूवात केली अन् दरडीच्या आडोशाला दबा धरुन बसलेल्या काळाने संधी साधली. ३५ घरं असलेल्या तळीये गावात मृत्यूनं अक्षरशः तांडव घातलं. बाळसं धरणाऱ्या चिमुकल्या जीवांपासून ते त्यांना खेळवण्यासाठी आसुसलेल्या वृद्धांवर काळाने झडप घातली. दगड मातीच्या ढिगाऱ्याने तळीयेतील अनेक जीवांचा घास घेतला. अचानक कोसळलेल्या संकटानं तळीये गावाचे हुंदके अजूनही थांबलेले नाहीत. पण डोळ्यातील आसवं थिजली आहेत. मातीतून काढले जाणारे मृतदेह आणि त्यांची होत असलेली विटंबना पाहून ग्रामस्थांचं काळीज हेलावलं आणि त्यांनी ढिगाऱ्याखाली गाडलेल्या जीवलगांच्या परतीची आशाही सोडली. हुंदके आवरत ग्रामस्थांनी प्रशासनाला विनवणी केली आणि प्रशासनानं ३१ बेपत्तांना मृत घोषित करत शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेतला.

तळीये इथं आत्तापर्यंत ५३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. काल दिवसभरात ११ मृतदेह सापडले असले तरी ३१ जण मात्र ढिगाऱ्याखाली अडकल्याचं सांगितलं जात होतं. या अडकलेल्या नागरिकांना मृत घोषित करा आणि त्यांना बाहेर काढू नका अशी मागणी या गावातले नागरिक, मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करत होते. त्यामुळे आता शोध आणि बचाव मोहीम थांबवत त्या ३१ बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

ढिगाऱ्याखाली या मृतदेहांचं विघटन सुरु झाल्यामुळे त्यांना बाहेर काढणं आणखी कठीण होणार आहे. ते पाहून त्यांच्या नातेवाईकांना अधिकच दुःख आणि वेदना होतील. त्यामुळे त्यांना बाहेर न काढणंच योग्य असल्याची भावना मृतांच्या नातेवाईकांनीही व्यक्त केली होती. गावातले लोकप्रतिनिधी आणि मृतांच्या नातेवाईकांनी आता मृतदेहांची अधिक विटंबना न करता त्यांना मृत घोषित करुन मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर दस्ताऐवजांची पूर्तता शासनाने करावी अशी मागणी केली होती.

मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी बचाव आणि मदतकार्य सुरुच ठेवण्याची भूमिका घेतली होती. गावातल्या सगळ्या नागरिकांनी जरी विरोध केला तरी हे काम सुरुच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. एकूण एक बेपत्ता व्यक्ती जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यंत हे मदत आणि बचावकार्य सुरुच राहील, अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी मांडली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2021 2:16 pm

Web Title: taliye rain land slide orders by collector to stop the rescue operation vsk 98
Next Stories
1 “हा ‘पुरूषार्थ’ दाखवल्यामुळे धन्य झाले असतील बाळासाहेब…”
2 परप्रांतीयांसदर्भात माझी भूमिका काय? राज ठाकरेंनी भाजपाला पाठवली भाषणाची लिंक
3 मनसेसोबत युतीची चर्चा झाली का?; फडणवीसांनी केला खुलासा
Just Now!
X