सोलापूर येथील एका कांदा व्यापाऱ्याची तामिळनाडूतील व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विश्वास संपादन करून वेळोवेळी सोलापूरच्या नागनाथ जवाळे यांच्याकडून त्यांनी कांदा विकत घेतला. त्याचे ३५ लाख रुपये दिले नाहीत. उलट दमदाटी केली. याबाबत तामिळनाडूच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागनाथ धर्माण्णा जवाळे (वय ५२, रा. शेळगी, सोलापूर) यांच्याकडून तामिळनाडू येथील चौघांनी जून २०१५ ते २६ जुलै २०१७ दरम्यान सुमारे ६० ट्रक कांदा घेतला. तामिळनाडू येथील के. बी. संगसिड, एस. आर. ट्रेडिंग कंपनीचे मालक शिवकुमार, व्ही. आर. एच. ट्रेडर्स, जय अनंती नागरकोयल या चौघांनी हा कांदा खरेदी केला. मात्र त्याचे ३५,१३,१८७ रुपये दिले नाहीत. पैशाची मागणी केली असता जवाळे यांना दमदाटी करण्यात आली. जवाळे यांनी तशी फिर्याद जेलरोड पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यातही कांदा व्यापाऱ्याची तामिळनाडू येथील व्यापाऱ्यांनी अशाच प्रकारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली होती. मात्र याबाबत अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.