04 March 2021

News Flash

कोकण बोर्डातर्फे तनया वाडकरचा गौरव

राज्यात कोकण बोर्ड आणि कोकण बोर्डात सिंधुदुर्ग राज्यात अव्वल ठरला.

राज्यात कोकण बोर्ड आणि कोकण बोर्डात सिंधुदुर्ग राज्यात अव्वल ठरला. सावंतवाडी कळसुलकर विद्यालयाच्या तनया रामचंद्र वाडकर हिने १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांकाने अव्वल स्थान प्राप्त केले. या कोकणच्या रत्नाचा अभिमान सर्वाना आहे. तनया वाडकरच्या रूपाने कोकणचे रत्न देशाचे ठरले असल्याचे गौरवोद्गार कोकण विभागीय बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष व विभागीय सचिव आर. व्ही. गिरी यांनी काढले.
सावंतवाडी कळसुलकर हायस्कूलची विद्यार्थिनी तनया वाडकर हिने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. त्याचा अभिमान कोकण बोर्डाला आहे. कोकण बोर्डाने अल्पावधीतच यशाचा तुरा खोवला आहे असे विभागीय सचिव आर. व्ही. गिरी म्हणाले. त्यांनी तनया वाडकर हिचा खास गौरव करून पेढादेखील भरविला. शिवाय कळसुलकरचे गुणवंत विद्यार्थी अंकिता नाईक, समीक्षा देसाई, कोमल नाईक, दीक्षा सावंत, ओंकार चोडणकर, अक्षय जाधव आदी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष राजन पोकळे, रमेश बोंद्रे, गोविंद वाडकर, शशी नेवगी, प्रा. अल्ताफ खान, प्रा. काळे, विलास पंडित, अनिल भिसे, प्रा. बेकनाळकर, तनया वाडकर, रामचंद्र वाडकर, चेतन नेवगी, सौ. शिरोडकर, गटशिक्षणाधिकारी शुभांगी होळीकर, नरेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.
या संस्थेचे अध्यक्ष तथा नगर परिषद उपाध्यक्ष राजन पोकळे यांनी ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असून या शाळेचे विद्यार्थी देश-विदेशात, प्रशासनात आहेत, असे सांगत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बळावर यशोशिखर गाठण्याचा प्रयत्न करू असे स्पष्ट केले. विद्यार्थिनी तनया वाडकर हिने, यशाचे श्रेय आई-वडील, शाळा, शिक्षक असे सर्वाना देत आपण आयपीएस अधिकारी बनू असा विश्वास व्यक्त केला. वडील रामचंद्र वाडकर यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी कोकण विभागीय बोर्डाचे प्रभारी अध्यक्ष आर. व्ही. गिरी म्हणाले, कोकण बोर्डाला सतत यश मिळत आहे. राज्यात कोकण बोर्ड प्रथम क्रमांकावर असून त्यात सिंधुदुर्ग आघाडीवर आहे. त्याहीपेक्षा मुलीच सर्वाधिक गुणवान ठरल्या आहेत. कोकणाने देशाला अनेक रत्ने दिली. कोकण भूमी रत्नांची खाण आहे हे तनया वाडकर हिने सिद्ध करून दाखविले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात शैक्षणिकदृष्टय़ा प्रगत ठरला आहे. त्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो असे त्यांनी स्पष्ट केले.
दहावीच्या शालान्त परीक्षेत रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर असून मुलीच गुणवत्तेत आघाडीवर आहेत. त्यामुळे मुली शैक्षणिकदृष्टय़ा प्रगतिपथावर असून, मुलींना शिकवा म्हणून सांगण्याची गरज नाही असे गिरी म्हणाले. कोकणच्या रत्नानी कोकण बोर्डाचा सन्मान राज्यात निर्माण केला. त्यामुळे हा आनंद गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर सही करताना मला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गोविंद वाडकर यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:38 am

Web Title: tanaya wadkar konkan board
Next Stories
1 ‘पर्यावरण समतोलासाठी प्रयत्नांची सुरुवात करा’
2 माथेरानला फिनॅक्युलर रेल्वेने जोडण्यासाठी हालचाली
3 सुटीच्या हंगामात कोकणात ९३ अपघाती मृत्यू
Just Now!
X