तालुक्यातील नेरगाव शिवारात छापा टाकून पोलिसांनी घरगुती वापराचे ८२ सिलिंडर जप्त केले. हे सर्व सिलिंडर अनधिकृत असून त्यातील ३४ भरलेले तर उर्वरित ४८ रिकामे आढळले. बोलेरो जीप व दोन वीज पंप असा तब्बल चार लाख ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली. मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. आहेर, पोलीस उपनिरीक्षक गोविंद गढरी, हिरालाल बैरागी यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे धुळे-सुरत महामार्गावरील चेंदड भिलाटीजवळ ही कारवाई केली. सुमित उर्फ ढबूशेठ जयस्वाल (रा. नेर, धुळे) याने स्वत:च्या फायद्यासाठी इम्रानखान नवाबखान पठाण (३२गांधी चौक, नेर) व दादा उखा ठाकरे (३५, चेंदड भिलाडी) यांच्या मदतीने टँकरमधून घरगुती वापराचा गॅस काढून तो बेकायदेशीरपणे सिलिंडरमध्ये भरण्याचा आणि भरलेले सिलिंडर बेकायदेशीरपणे काळ्या बाजारात विकण्याचा व्यवसाय चालविला होता, अशी माहिती पोलीस यंत्रणेने दिली आहे. या कामासाठी संबंधितांकडून वापरली जाणारी बोलेरो जीप, विजेवर चालणारे दोन पंप, वजनकाटा, नोझल, चिमटे व नळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.