टँकरमुक्तीच्या घोषणांना वाकुल्या दाखवत राज्यात पावसाळा संपतानाही ३७ गावे आणि ५३ वाडय़ांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात असून अहमदनगर जिल्ह्य़ातील ६ गावांना तर ऑक्टोबर महिन्यातच टँकरने पाणी पुरवण्याची वेळ आली आहे.
राज्यात दरवर्षी उन्हाळ्यात शेकडो गावांना टँकरने पाणी पुरवण्याची वेळ येते, ही वस्तूस्थिती आहे. यंदा तर पावसाळा उशिरा सुरू झाला. जून महिन्यात १४०५ गावे आणि ३ हजार ४३६ वाडय़ांना टँकर लागले. जुलैमध्ये ही संख्या कमी होण्याऐवजी वाढली. जुलैत १५५९ गावे आणि ३९७४ वाडय़ांमध्ये टँकर मधून पाणीवाटप झाले. या दोन महिन्यात अनुक्रमे १३९३ आणि १७३९ टँकर्सचा वापर झाला. ऑगस्टमध्येही १५५६ टँकर्स लागले आणि १३१३ गावे तसेच ३३७० वाडय़ांना पाणी पुरवावे लागले. सप्टेंबरमध्ये ९३ गावे, वाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. ऑक्टोबरमध्येही सद्यस्थितीत ९० गावे-वाडय़ांना टँकर्सचीच प्रतीक्षा करावी लागते.
या महिन्यात अहमदनगर जिल्ह्य़ातील सहा तहानलेली गावे नव्याने टँकरच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. पाण्याच्या थेंबासाठी दाही दिशा वणवण करणाऱ्या वाडय़ावस्त्यांपासून ते मोठय़ा शहरातील धावत्या जनजीवनापर्यंत साऱ्यांना दरवेळी चटके देणाऱ्या अनुभवातून अजूनपर्यंत सरकारला धडा घेता आलेला नाही. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना कुचकामी ठरत आल्या असून पूर्वतयारीही फोल ठरत आली आहे. भौगोलिक रचना, पाऊसमान, भूपृष्ठावरील जलसाठय़ाची स्थिती, पाणी वापराचे नियोजन आणि बाष्पीभवनाचे प्रमाण या घटकांवर पाणीटंचाईची स्थिती प्रामुख्याने अवलंबून असते. कोकणात पावसाळ्यातील सरासरी ९५ दिवसांमध्ये ३ हजार १६१ मि.मी., विदर्भात ५१ दिवसांमध्ये १ हजार १०६ मि.मी., तर पश्चिम महाराष्ट्रात ५१ दिवसांमध्ये १ हजार मि.मी. पाऊस होतो. हवामान खात्याने सत्तर वर्षांतील पाऊसमान आणि पर्जन्य दिवसाच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढला आहे. राज्यात वर्षांतील ५९ दिवसांमध्ये पाऊस होतो, पण आता पाऊसमानावर परिणाम होऊ लागला आहे.
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गेल्या पन्नास वर्षांमध्ये हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, पण गावे टँकरमुक्त होऊ शकलेली नाहीत. जलसंधारणाच्या कामांची प्रभावी अंमलबजावणी होऊ न शकल्याने गावे टँकरमुक्त करण्याचे प्रयत्न अपयशी ठरत आले आहेत. जलसंधारण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सुमारे ६० हजार सूक्ष्म पाणलोट आहेत. यातील पन्नास टक्केही पाणलोट अद्याप विकसित केले गेले नाहीत. धरणांमधील पाणीसाठय़ाच्या मर्यादा आहेत. अशा स्थितीत जलसंधारणातूनच पाणी टंचाईला सामोरे जाता येऊ शकेल, असे अभ्यासकांचे मत आहे. सद्यस्थितीत सर्वाधिक २२ टँकर्स मराठवाडय़ातील २७ गावे-वाडय़ांमध्ये लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ४४ गावे-वाडय़ांसाठी, तसेच पश्चिम विदर्भातील ३ गावांसाठी प्रत्येकी १० टँकर्स आहेत. उत्तर महाराष्ट्रातील १६ गावे-वाडय़ांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. कोकण आणि पूर्व विदर्भ मात्र तीव्र पाणीटंचाईमुक्त झाला आहे. सध्या या दोन्ही विभागात एकही टँकर सुरू नाही. कोकण आणि पूर्व विदर्भ ऑगस्टमध्येच टँकरमुक्त झाला होता. टँकरमुक्तीसाठी जलसंधारणाच्या कामांची प्रभावी अंमजबजावणी आणि पाणी टंचाई निवारणाचे सूक्ष्म नियोजन आवश्यक असल्याचे दरवर्षी सांगितले जाते, पण अजूनही टँकरमुक्ती दृष्टीपथात आलेली नाही.