देशात आणि राज्यात करोना संक्रमणाचा प्रसार झपाट्याने होत आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीरसह लसींचाही तुटवडा जाणवत आहे. लसींसाठी केंद्राकडे ओरड होत असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुतण्यामुळे अडचणीत आले आहेत. पुतण्या तन्मय फडणवीसने लस घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काँग्रेसनंही यावरून काही शंका उपस्थित केल्या असून, भाजपावर गंभीर आरोप केला आहे.

देशात सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणालाच परवानगी देण्यात आलेली असून, देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर फोटो पोस्ट केला होता. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून आपण दुसरा डोस घेतल्याचं त्याने म्हटलं होतं. यावरून महाराष्ट्र काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- “आपण तन्मयला धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्याच्यामुळे केंद्राला…”

तन्मय फडणवीस याचा लस घेतानाचा फोटो पोस्ट करत काँग्रेसने काही सवाल भाजपाला केले आहेत. “नाव… तन्मय फडणवीस, कोण… देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या. तन्मय फडणवीस ४५ वर्षांपेक्षा मोठा आहे का?, तन्मय फ्रंटलाईन वर्कर आहे का?, आरोग्य कर्मचारी आहे का? जर नसेल, तर त्याला लस दिलीच कशी काय गेली? भाजपाकडे रेमडेसिवीरप्रमाणेच लसींचा सुद्धा गुप्त साठा आहे का?,” असे प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केले आहेत.

“४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजपा नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा, मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का!,” असंही काँग्रेसनं म्हटलं आहे.

आणखी वाचा- …म्हणून आम्ही तन्मय फडणवीसला लसीचा दुसरा डोस दिला; रुग्णालयाचं स्पष्टीकरण

तन्मयने लस घेतल्यानंतर फोटो पोस्ट केला होता. मात्र, यावरून अनेकांनी शंका आणि प्रश्न उपस्थित केल्या. त्यानंतर हा फोटो डिलीट करण्यात आला. पण तोपर्यंत हा फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.