सांगलीतील २५ वर्षांनंतरची लोकसंख्या गृहीत धरून पुरेसे शुद्ध पाणी देण्यासाठी वाढीव नळपाणी योजना डिसेंबपर्यंत पूर्ण होईल असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी सांगितले. यावेळी स्थायी सभापती राजेश नाईक उपस्थित होते.  
सांगली-तासगाव रस्त्यावरील माळबंगला येथे सुरू असलेल्या कामाची त्यांनी माहिती दिली. विचाराधीन योजनांचाही आढावा घेतला. ते म्हणाले, केंद्र शासनाने यूआयडीएसएसएमटी अंतर्गत सुधारित व विस्तारित सांगली-कुपवाड नळपाणी पुरवठा योजनेला सप्टेंबर २००६ मध्ये मान्यता दिली. त्याची मूळ किंमत ७९.०२ कोटी होती. त्यात केंद्राचा ६३.२१ कोटी, राज्याचा ७.९० कोटी आणि महापालिकेचा ७.९० कोटी हिस्सा होता. केंद्र व राज्याकडून पूर्ण निधी मिळाला आहे. पालिकेने हिस्स्यापेक्षा जास्त पसे खर्च केले आहेत. आजअखेर ७९ कोटी रुपये खर्चही झाले आहेत; परंतु, योजनेस मंजुरी व निधी मिळण्यास विलंब लागल्याने हा मूळ खर्च आता १३१.६३ कोटी रुपयांवर पोचला आहे. त्यात केंद्र व राज्याकडून ८७ कोटी ९२ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. उर्वरित ४३.७१ कोटी रुपये महापालिकेला उभे करावे लागणार आहेत. त्यापकी ८.६३ कोटी रुपयांची आधी तरतूद केलेली आहे. अन्य रक्कम उभी करण्यात एलबीटीच्या विषयामुळे अडचणी वाढल्या आहेत. त्याबाबत पालिका अन्य पर्यायांचा विचार करीत असून निर्धारित वेळेत निधी उभा केला जाईल.
ते म्हणाले, ही योजना पूर्ण झाल्यानंतर सांगली शहर, विस्तारित भागासह कुपवाड आणि तेथील विस्तारित भागात पुरेसा आणि शुद्ध पाणीपुरवठा होऊ शकेल. सध्या काही ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळित आहे. त्याला भारनियमनही कारणीभूत आहे. एक्स्प्रेस फिडर घेऊनही अडचणी आहेत. त्यामुळे महावितरणला नोटीस काढली आहे. येत्या १० तारखेला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बठक घेऊन नियमित वीजपुरवठय़ाबाबत चर्चा होणार आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचा-यांमध्ये संवादाचा अभाव असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचा-यांना मोफत सीमकार्ड दिले जाणार आहेत. त्याची बिले महापालिका भरणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.
सांगलीसाठी ५ व कुपवाड विभागासाठी ८ उंच टाक्या, वितरण व्यवस्था करण्यात येणार असून माळबंगला येथे अत्याधुनिक ७०  दशलक्ष लिटरचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील २२ उंच टाक्यांची दुरुस्ती करून माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करून क्षमता ५६ दशलक्ष लिटर करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.