तीन लाख रुपये खर्च करूनही नळपाणी योजना बंद, चौकशीची मागणी

लोकसत्ता वार्ताहर

वाडा: विक्रमगड तालुक्यातील  कऱ्हे-तळावली या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चुन्याचा पाडा येथील लघु नळपाणी योजना सन २०१७ मध्ये २ लाख ९४ हजार रुपये खर्चून पूर्ण करण्यात आली आहे. मात्र गेल्या तीन वर्षांनंतरही या नळपाणी योजनेतून ग्रामस्थांना आजतागायत पाणीपुरवठा होऊ शकलेला  नाही. चुनापाडय़ातील ग्रामस्थांना ठेकेदाराने चुना लावल्याने या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

कऱ्हे ग्रामपंचायत क्षेत्रातील चुन्याचा पाडा येथे तीन वर्षांपूर्वी लघू नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत या योजनेचे पाणी एकदाही प्यायला मिळालेले नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. सूर्या धरणापासून केवळ १० ते ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असते.

तीन वर्षे सुरू न झालेली ही नळपाणी योजना सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही.

सध्या या पाणी योजनेची अवस्था तुटलेले नळ, तुटलेल्या नळाचा चौथरा फक्त गावात दिसत आहेत. ही पाणी योजना सुरू न झाल्याने येथील महिलांना  पाणी भरण्यासाठी येथे एकमेव असलेल्या कुपनलिकाचा असरा घ्यावा लागला आहे. यात महिलांची मोठी परवड होते.

तीन लाख रुपये खर्च करून एकदाही नळाला पाणी आले नाही. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार झाल्याची शंका येथील नागरिकांनी उपस्थितीत केली आहे. या प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे.

या नळपाणी योजनेतील त्रुटी दूर करून तात्काळ योजना सुरू करावी व येथील महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवावी
– नीता मधुकर तुंबडा, स्थानिक महिला, कऱ्हे (चुन्याचापाडा)

येथे कमी दाबाचा विद्युत पुरवठा असल्याने ही योजना बंद आहे. महावितरणकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
– सुलोचना लांघी, ग्रामसेविका, ग्रामपंचायत, कऱ्हे-तळावली