समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या आणि आपल्या कर्तृत्वाने इतरांसाठी आदर्श व प्रेरणादायी ठरणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाईला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे कोंदण लाभणार आहे. भविष्यालाही अभिमान वाटेल अशा वर्तमानाचा गौरव ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमातून होणार असून, ही निवड आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांतील पाच तज्ज्ञांची समिती ही निवड करणार आहे.

‘तरुण तेजांकितां’ची निवड करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, ‘एल अँड टी फायनान्स होल्डिंग’चे माजी अध्यक्ष वाय. एम. देवस्थळी, ‘स्नेहालय’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर आणि ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

समितीची बैठक नुकतीच मुंबईत ‘लोकसत्ता’ कार्यालयात पार पडली. ‘तरुण तेजांकित’साठी ‘लोकसत्ता’ने स्वनामांकन अर्ज मागविले होते. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ५०० अर्ज ‘लोकसत्ता’कडे आले होते. त्या अर्जाची छाननी करून अंतिम निवडीसाठी ४२ जणांचा विचार करण्यात आला. या ४२ जणांमधून १२ ‘तरुण तेजांकित’ निवडण्यात येणार आहेत.

या बैठकीत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी उपक्रमामागील ‘लोकसत्ता’ची भूमिका तज्ज्ञ समितीपुढे मांडली. कुबेर म्हणाले, मराठीजनांना इतिहासात रमायला खूप आवडते. पूर्वीचे जे काही होते ते खूप चांगले असा गैरसमज आपणच कवटाळून बसलो आहोत. पण तो समज चुकीचा आहे. कारण वर्तमानातही समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी अनेक तरुण मंडळी आपापल्या परीने काम करत आहेत. त्यांचे हे काम इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणादायी असेच आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारी ही तरुणाई आणि त्यांची सकारात्मक ऊर्जा समाजापुढे ठळकपणे आणण्यासाठी ‘लोकसत्ता’ने हा उपक्रम सुरू केला आहे. ‘‘वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणारे १२ लखलखते हिरे ‘तरुण तेजांकित’च्या उपक्रमातून ‘लोकसत्ता’ समाजापुढे आणणार आहे. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचे यंदा पहिले वर्ष असून, यापुढे दरवर्षी हा उपक्रम सुरू राहणार आहे. हे ‘तरुण तेजांकित’ समाजापुढे नक्कीच आदर्श निर्माण करतील. सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा हा प्रवाह या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी वाहता राहील,’’ असेही कुबेर यांनी सांगितले.

उपक्रमाचे टायटल पार्टनर केसरी टुर्स, असोसिएट पार्टनर मिराडोर, सारस्वत बँक, पॉवर्ड बाय एम.के.घारे ज्वेलर्स, एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेड आणि टेलिव्हिजन पार्टनर एबीपी माझा हे आहेत.

निवड समितीमधील तज्ज्ञ म्हणतात..

तटस्थपणे निवड करणार

वेगवेगळ्या क्षेत्रांतील सुमारे ५०० अर्ज ‘लोकसत्ता’ला प्राप्त झाले. त्यांची छाननी करून अंतिम निवड करताना या संबंधितांनी त्या त्या क्षेत्रात दिलेले योगदान विचारात घेतले जाईल. ही निवड कोणताही दुजाभाव न ठेवता तटस्थपणे करण्यात येणार असून, निवडलेले हे ‘तरुण तेजांकित’ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही अग्रेसर आणि उद्यमशील तरुण ठरतील. ‘लोकसत्ता’ने हे प्रेरणादायी संचित या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापुढे आणण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.

– कमलाकर सोनटक्के

नवा महाराष्ट्र घडविणारी पिढी

‘तरुण तेजांकित’ या उपक्रमाच्या माध्यमातून नवा महाराष्ट्र घडविणारी पिढी समाजापुढे आणण्याचे महत्त्वाचे काम ‘लोकसत्ता’ने केले आहे. वर्तमानपत्रांतून सातत्याने नकारात्मक बातम्याच वाचायला मिळतात. पण ‘लोकसत्ता’ने या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला प्रेरणादायी ठरतील असे तरुण निवडून त्यांचे काम सर्वापुढे ठेवण्याचे सकारात्मक काम केले आहे.

– डॉ. गिरीश कुलकर्णी

सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणारा उपक्रम

या निवड समितीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगगवेगळ्या भागांतील आणि क्षेत्रांतील वेगवेगळे उपक्रम राबविणाऱ्या नवोन्मेषी तरुणाईचा शोध घेता आला. आजची तरुणाई काय काम करते हे कळण्यास मदत झाली. ‘तरुण तेजांकितां’ची निवड अन्य तरुणांचा उत्साह वाढविणारी आणि त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. अंतिम बारा जणांची निवड करणे हे काम खरोखरच आव्हानात्मक होते. मात्र या तरुणाईचा धोका पत्करण्याची तयारी, स्वत:चे करिअर घडविताना असलेली सामाजिक जाणीव आणि उचललेली जबाबदारी, नावीन्यपूर्ण कल्पना, या कल्पना पुढे नेण्यासाठी केलेले प्रयत्न आदी निकषांवर ही निवड केली जाणार आहे. ‘लोकसत्ता’च्या इतर उपक्रमांप्रमाणेच ‘तरुण तेजांकित’ हा उपक्रमही तेवढाच महत्त्वाचा असून तो सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणारा ठरेल.

– अश्विनी भिडे

कर्तृत्व आणि काम हा महत्त्वाचा निकष

‘तरुण तेजांकित’ची निवड करताना त्या त्या क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्व आणि त्यांनी केलेले काम या दोन महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला गेला. महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीनेही त्यांच्या कामाचे महत्त्व काय, कोणी व्यवसाय करत असेल तर त्याचा देश आणि समाजाला किती फायदा झाला, याचाही विचार केला गेला.

– वाय. एम. देवस्थळी

अधिकाधिक प्रगती करण्याची प्रेरणा

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा उपक्रम खरोखरच वेगळा आणि कौतुकास्पद आहे. क्रीडा क्षेत्रासाठी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळविलेले यश असा निकष विचारात घेतला गेला. या निकषांवर तुलना केल्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी ‘तरुण तेजांकित’ची निवड करणे तुलनेत अधिक सोपे गेले. निवड झालेल्या ‘तरुण तेजांकितां’मुळे इतरांनाही त्यांच्यापासून प्रोत्साहन आणि प्रेरणा घेऊन टप्प्याटप्प्याने अधिकाधिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळेल.

– वि. वि. करमरकर