तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सुमारे ५८ टक्के मतदान झाले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी शनिवारी शांततेत मतदान झाले. पहिल्या दोन तासांत मतदार मतदानासाठी बाहेर पडले नाहीत. मात्र दुपारनंतर केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. गेल्या सहा निवडणुकीत या मतदारसंघाचे आर. आर. पाटील यांनी प्रतिनिधित्व केले होते.
निवडणूक िरगणात ९ उमेदवार असले तरी खरी लढत श्रीमती पाटील आणि अ‍ॅड. स्वप्निल पाटील यांच्यात होत आहे. याठिकाणी सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार न देता श्रीमती पाटील यांना पािठबा दिला होता. त्यामुळे वरकरणी एकतर्फी वाटली तरी सुप्तपणे निवडणुकीचे वातावरण तयार होत गेले आहे. पोटनिवडणुकीसाठी सकाळी ८ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सुरुवातीच्या टप्प्यात मतदारांचा उत्साह कमी होता. दुपारनंतर मात्र मतदान केंद्रांवर गर्दी वाढू लागली. अनेक ठिकाणी मतदार मतदानासाठी गटागटाने येत होते.