तासगाव-कवठे महांकाळ पोटनिवडणुकीसाठी आबांच्या पत्नी सुमन पाटील यांना विरोध न करण्याचा निर्णय रविवारी भाजपच्या उमेदवारीसाठी दावा करणारे अजितराव घोरपडे यांनी जाहीर केला. घोरपडे यांच्या या निर्णयामुळे तासगावची निवडणूक आता राष्ट्रवादीसाठी एकतर्फी झाली असून, पाटील मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या ठिकाणी पक्षाची उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची बठक आज झाली. या बठकीस घोरपडे यांचे कट्टर समर्थक असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य तानाजी यमगर, पंचायत समितीचे सदस्य कुमठेकर, दिलीप झुरे, सुनील पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य टी. एल. पवार, महेश पवार आदी प्रमुख कार्यकर्त्यांची रविवारी कवठेमहांकाळ तालुका दूध संघाच्या आवारात बठक झाली.
या बठकीत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी पोटनिवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा आग्रह धरला होता. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर घोरपडे यांनी या पोटनिवडणुकीत आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी राष्ट्रवादीने दिली असून या वेळी त्यांच्या उमेदवारीला विरोध न करता पािठबा देण्याचा निर्णय पक्षनेत्यांनी घेतला असल्याचे सांगत या वेळी निवडणूक न लढवण्याचा आपला निर्णय जाहीर केला. मात्र राष्ट्रवादीने ऐनवेळी पाटील यांच्याऐवजी आबांचे बंधू सुरेश पाटील यांची उमेदवारी दाखल केली तर निवडणूक लढवण्याचा निर्णयही घेण्यात आला.
भाजपने उमेदवारी न देण्याचा घेतलेला निर्णय अनेक कार्यकर्त्यांना न रुचणारा असला तरी प्राप्त परिस्थितीत पक्षासोबत राहणे योग्य असल्याचे सांगत घोरपडे यांनी एकप्रकारे माघारच घेतली आहे. शनिवारी रात्रीही सावळज येथे एका कार्यकर्त्यांच्या घरी पोटनिवडणुकीतील घोरपडे गटाच्या भूमिकेबद्दल चर्चा झाली होती. त्या वेळीही कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवण्याचा आग्रह धरला होता.
तासगाव-कवठेमहांकाळ पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत अद्याप दोन दिवस आहे. आतापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. घोरपडे गटाने या पोटनिवडणुकीत शांत राहण्याचा निर्णय घेतल्याने आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांची निवड एकतर्फी होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.