सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. दोघांचे नाते हे नाण्यांशीच असल्याचे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते रायगड जिल्ह्य़ात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव, अलिबाग आणि कर्जत येथे प्रचारसभा घेतल्या. आपल्या भाषणात त्यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि शेकापवर सडकून टीका केली. रायगड जिल्ह्य़ात लोकसभा निवडणुकीपासून तटकरे आणि जयंत पाटील या दोघांचे साटेलोट आहे. शिवसेनेला संपवण्यासाठीच शेकापने युती तोडली आहे. राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका कायम शेकापची राहिली आहे. भाडोत्री उमेदवार आणायचे आणि तटकरे यांना विरोध करायचे नाटक शेकाप करत आली असल्याचा आरोप त्यांनी केला. शेकापनी जिल्ह्य़ातील शेतकरी उद्ध्वस्त केल्याची टीका त्यांनी केली आहे. शेकापचे धोरण हे शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात असल्याचेही ते म्हणाले. ज्यात शिवसेनेची सत्ता आली तर अलिबाग तालुक्यात महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचे यथोचित स्मारक उभारले जाईल, मात्र या स्मारकाला धर्माधिकारी कुटुंबाने नकार देऊ नये, अशी विनंती त्यांनी केली.
राज्याचे तुकडे तोडण्यास निघालेल्या भाजपाला निवडून देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. भाजपाचे केंद्रातील आणि इतर राज्यांतील मंत्री सध्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. गल्लीबोळात सभा घेऊन लोकसभेला सदरा दिला. आता पायजमा द्या मागत फिरत आहेत. मग काय पायजमा न घालता प्रचाराला फिरत आहात, असा उपरोधिक टोला त्यांनी भाजपला लगावला. सत्तेसाठी भाजपाने २५ वर्षांची युती तोडल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाला आमचा विरोध नाही. पण शेतकऱ्यांना जमिनीचा चांगला मोबदला मिळणार असेल तर आम्ही दिल्ली- मुंबई दिल्ली कॉरिडोरला विरोध करणार नाही. मात्र त्यापूर्वी हा प्रकल्प नेमका काय आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. शेतकऱ्यांचा विरोध असेल तर प्रकल्पासाठी एक इंच जागाही घेऊ देणार नाही. निळवंडे धरणाचे पाणी मागायला गेलेल्या शेतकऱ्यांवर मुख्यमंत्री पोलिसांकडून हल्ला चढवतात. अजित पवारांनी तर पाणी मागायची सोयच ठेवली नाही. अशा लोकांना निवडून देणार का? असा सवाल त्यांनी केला.
सध्या राज्यभरात ठिकठिकाणी करोडो रुपये पकडले जात आहेत. हे तुमच्या कष्टाचे पसे आहेत. वेगवेगळ्या योजनांमध्ये घोटाळे करून हा पसा या लोकांनी कमावला आणि आता तो गावागावांत वाटला जातो असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. भाजपने लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताचे लक्ष्य ठेवले होते. त्याला आम्ही कधी विरोध केला नाही. मग विधानसभेला शिवसेनेने मिशन १५० ठेवले तर त्यात काय चुकले? असा सवाल त्यांनी भाजपला केला. या वेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते उपस्थित होते. रायगडातील सातही विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
शेकापच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन
अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दोन-तीन अपवाद वगळता मतदारसंघावर कायम शेकापचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये शेकापसोबत राहणारी युती असल्याने मतदारसंघात सेनेने उमेदवार दिला नव्हता. लोकसभा निवडणुकीपूर्वी शेकाप-सेना युती संपुष्टात आल्याने शिवसेनेने या वेळी महेंद्र दळवी यांना अलिबागमधून उमेदवारी दिली आहे. मतदारसंघात शिवसेनेची ताकद नाही, असा आरोप आजवर शेकापकडून केला जात आला आहे. ही बाब लक्षात घेऊन रविवारी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.