सध्या सर्वच राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे लक्ष लोकसभा निवडणुकीपाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरही असल्याने प्रत्येक गणितं त्यादृष्टीने मांडून पाहण्याची लगबग सर्व पक्ष कार्यालयांत सुरू आहे. उत्तर रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम यांनी केलेली बंडखोरी आणि शेकापच्या पािठब्याने रायगड लोकसभा मतदारसंघाच्या िरगणात घेतलेली उडी त्याच राजकीय हालचालींचे संकेत ठरत आहेत. रमेश कदम यांच्या उमेदवारीने जेवढे नुकसान गीतेंचे होणार आहे, तेवढेच तटकरे यांनाही ते तोटय़ाचे ठरेल, अशी शक्यता आता राजकीय निरीक्षकांत व्यक्त होत आहे.  गेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापने शिवसेनेच्या पाठीशी राहून अनंत गीते यांना रायगडातून बढत दिली होती. यंदा या मत्रीमध्ये काडीमोड झाल्याने शेकापने रायगडातून चिपळूणमधील राष्ट्रावादीचे नेते रमेश कदम यांना िरगणात उभे करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे रमेश कदम हे एकेकाळचे सुनील तटकरे यांचेच कट्टर समर्थक समजले जातात. कदम यांचे भास्कर जाधव यांच्याशी असलेले मतभेद आणि त्याच पाश्र्वभूमीवर चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तिकिटावर झालेला त्यांचा पराभव हे सर्वश्रुत आहे. पण हा मतदारसंघ मूळचा भास्कर जाधव यांचा असल्याने रमेश कदम यांच्या पराभवामागेही जाधव यांच्याच दबावगटाचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात त्या वेळी रंगली होती. पक्षात जुन्या निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या रमेश कदम यांना शिवसेनेतून बंडखोरी करून आलेल्या जाधव यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेतही मात देत आता थेट प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे. या राजकीय परिस्थितीत रमेश कदम यांना रायगडातून मिळालेली शेकापची उमेदवारी उत्तर रत्नागिरीत एक महत्त्वाचे राजकीय स्थित्यंतर समजले जात आहे.
मुळात रायगडातील नेते सुनील तटकरे हे सध्याचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धीच समजले जातात. लोकसभेतील ‘टक्का’ वाढवण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीतील मतभेदांना तिलांजली देण्याची भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली असली तरी स्थानिक स्तरावर असलेल्या दबावगटातील नेत्यांची दिलजमाई घडवून आणणे, या दोघांसाठीही किचकट काम ठरणार आहे. साहजिकच पक्षाची व्होटबँक असलेल्या विविध विभागांतूनच तटकरे यांना संभाव्य विरोध अजूनही प्रतिस्पध्र्याच्या अजेंडय़ावर आहे. या पाश्र्वभूमीवर िरगणात तिसरा मोहरा उतरवून नकारात्मक मतदानाचा ओघ त्याच्याकडे वळवण्याची इच्छा जशी राष्ट्रवादीची आहे, तशीच गीते यांच्या विरोधात हल्लाबोल करणाऱ्या शेकापलाही अपेक्षित आहे.
रमेश कदम तीच ‘गॅपफििलग’ करून राष्ट्रवादीतील संभाव्य तटकरेविरोधी व्होटबँकेला पर्यायी उमेदवार ठरू शकतात, अशी व्यवस्था आता या तिरंगी लढतीत करण्यात आली आहे. या उमेदवारीमुळे रमेश कदम यांना आपल्या मतदारसंघातील ताकद दाखवण्याची संधी आहेच, पण त्यांच्या रूपाने शेकापही रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र ठसा उमटवण्याच्या विचारात आहे. शिवसेनेच्या अनंत गीते यांनी उत्तर रत्नागिरीतील निर्वविाद वर्चस्व मागच्याच निवडणुकीत दाखवून दिले होते. त्यातच शेकापची साथ मिळाल्याने त्यांनी रायगडातही चांगलीच बाजी मारली होती. साहजिकच यंदा गीतेविरोधाचे स्पष्ट संकेत देण्यासाठी शेकाप एखाद्या स्थानिक नेत्यालाच पुढे करतील आणि रायगडातील काँग्रेसमधील तटकरेविरोधाच्या वातावरणाचा फायदा घेतील, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज होता. पण हे सर्व तर्क खोटे ठरवत त्यांनी कमी मतदारसंख्या असलेल्या उत्तर रत्नागिरी विभागातील राष्ट्रवादीचे बंडखोर रमेश कदम यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शेकापची रायगडमधील सर्व व्होटबँक त्यांच्या मागे राहील का, हा प्रश्न कायम आहे. पण काँग्रेसची व्होटबँक मात्र काहीशी त्यांना साथ देऊ शकेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आघाडीत दुसरा पर्याय नाही, म्हणून तटकरेंना मतदान करणारी काँग्रेसची व्होटबँकदेखील राष्ट्रवादीचे बंडखोर म्हणून रमेश कदम यांच्या पाठीशी उभी राहू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे शेकापने म्यानातून काढलेली रमेश कदम यांची ही तलवार ‘दुधारी’ ठरण्याची शक्यता आहे.
त्यांचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो, याबाबत सध्या राजकीय आकडेमोड सुरू आहे. त्यातही तटकरेविरोधी मतदानाचे खापर स्वत:वर फुटण्याच्या शक्यतेने चिंतेत असलेल्या भास्कर जाधव यांनीही यानिमित्ताने सुटकेचा नि:श्वास टाकला असेल, अशी चर्चाही राजकीय निरीक्षकांत रंगली आहे.