भारताच्या नद्यांचे पाकिस्तानला जाणारे पाणी अडवून पाकिस्तानची कोंडी करण्याचा नितीन गडकरींचा निर्णय स्वागतार्ह आहे. पाकिस्तानचे पाणी अडवले आता दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट, व्यापार, व्यवहार असे सगळे संबंध तोडून आरपारची लढाई लढून पाकिस्तानला कायमचं अडवलं पाहिजे असं मत आरपीआयचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. भारताकडून पाणी घेऊन पाकिस्तान भारताशीच बेइमानी करत आहे. भारतात दहशतवाद पसरवून भारतीय सैनिकांचे रक्त सांडवणाऱ्या पाकिस्तानला कायमचे आडवे केले पाहिजे असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात आपल्या देशाचे चाळीसपेक्षा जास्त जवान शहीद झाले. १४ फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आपल्या देशावर हा भ्याड हल्ला केला. पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्या अशी मागणी देशभरातून होते आहे. अशात पाकिस्तानने दहशतवादी कारवाया आणि कुरापती संपवल्या नाही तर आम्ही पाकिस्तानला भारतातून जाणारे पाणी बंद करू असा इशाराच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. याच संदर्भात रामदास आठवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.