27 November 2020

News Flash

शिक्षकांकडूनच रोजंदारीवर पोट शिक्षकांची नेमणूक

सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी एकसूराने विभागाच्या कामकाजाचे वाभाडे काढले.

प्रतिनिधिक छायाचित्र

नंदुरबार जिल्हा परिषद सभेत आरोप

जिल्हा परिषदेच्या दुर्गम भागातील काही शाळांमध्ये नियुक्त शिक्षकांनीच आपल्या जागेवर १०० रूपये रोजंदारीवर बदली शिक्षक म्हणून काही तरूणांना नेमले असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या सभेत सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांनीच केल्याने खळबळ उडाली आहे.

सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी एकसूराने विभागाच्या कामकाजाचे वाभाडे काढले. अनेक वर्ष विनामानधन कार्यरत असणाऱ्या वस्तीशाळा शिक्षकांना न्याय देण्याची मागणी दोन्ही गटाकडून करण्यात आली. यावेळी अपंग शिक्षकांच्या भरतीत मोठे गौडबंगाल झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची कागदपत्रे तत्काळ सादर करण्याची मागणी शिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. संबंधित प्रकरणाची चौकशी सुरु असून कागदपत्रे आपल्या ताब्यात असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. अतीदुर्गम भागातील काही शाळांमध्ये नियुक्त शिक्षक झेंडावंदनासाठीच शाळेत येत असून त्यांनी आपल्या ऐवजी दुर्गम भागातील काही तरुण १०० रुपये रोजंदारीवर शिकविण्यासाठी नियुक्त केल्याचा आरोप अनेक सदस्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाकडून देण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनी विकास कामांवरुन अधिकाऱ्यांना चांगलच फटकारले. परिषदेकडून अनेक विकास कामे आणि जलयुक्तची कामे सुरु असतांना त्या गटातील जिल्हा परिषद सदस्याला कामांच्या शुभारंभावेळी बोलविले जात नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. जलयुक्त शिवारच्या एकाही कामाच्या शुभारंभ कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनाही आमंत्रित केले नसल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. त्यामुळे गावित यांनी जाब विचारल्यानंतर पुढील कोणत्याही कामाच्या शुभारंभाला त्या गटातील जिल्हा परिषद सदस्याला आमंत्रित करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 2:58 am

Web Title: teacher appointed proxy teacher on daily wage in zilla parishad schools
Next Stories
1 नगरसेवक समदखानच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला
2 राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न- राधाकृष्ण विखे
3 नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात आठवलेंच्या भाषणाला विरोध
Just Now!
X