News Flash

अन् त्या शिक्षकाने हुंडय़ासाठी लग्न मोडले

समाजात शिक्षकाला आदराने बघितले जाते. मात्र, काही शिक्षक याला अपवाद ठरतात.

हुंडा न दिल्याचे कारण पुढे करत एका शिक्षकाने लग्न मोडत आपल्या पेशाला काळीमा फासला

मुलीच्या वडिलांची पोलिसात तक्रार, आरोपी शिक्षक अटकेत

समाजात शिक्षकाला आदराने बघितले जाते. मात्र, काही शिक्षक याला अपवाद ठरतात. साक्षगंध झाल्यावर केवळ हुंडा न दिल्याचे कारण पुढे करत एका शिक्षकाने लग्न मोडत आपल्या पेशाला काळीमा फासला. ही घटना २८ एप्रिलला अर्जुनी-मोर. येथे उघडकीस आली आहे.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोर. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविला असून त्या शिक्षकाबरोबरच त्याच्या आईवडिलांनाही अटक केली आहे. अमोल श्यामराव लांजेवार रा. साकोली जि. भंडारा, ह.मु. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर असे त्या शिक्षकाचे नाव आहे. त्याचे अर्जुनी-मोर. येथील एका प्रतिष्ठत कुटुंबातील मुलीशी २५ नोव्हेंबर २०१६ ला लग्न जुळले. त्यानुसार ४ डिसेंबर २०१६ ला लाखांदूर येथे मुलीच्या काकांच्या निवासस्थानी दोघांच्या साक्षगंधाचा कार्यक्रमही पार पडला. यासाठी मुलीच्या वडिलांनी मोठी रक्कम खर्च करताना कार्यक्रमात कोणतीही उणीव येऊ दिली नाही, परंतु नेमकी माशी कोठे शिंकली ते कळलेच नाही. साक्षगंधानंतर वधू पित्याकडून वारंवार वर पित्याला लग्नाची तारीख काढण्याची विनंती केली. मात्र, अमोलच्या वडिलांकडून यासाठी टाळाटाळ करण्यात येऊ लागली. दरम्यानच्या काळात अमोल मुलीच्या घरी आला असताना तिच्या वडिलांनी लग्नाची तारीख ठरविण्याविषयी विनंती केली असता त्याने नोकरीसाठी पाच लाख रुपयांची गरज असल्याचे कारण सांगताना लग्नात पाच लाख रुपयाच्या हुंडय़ाची मागणी केली. यावेळी मुलीचे वडील व इतर नातेवाईकांनी त्याची समज काढण्याचे प्रयत्न करताना व एवढी मोठी रक्कम देऊ शकणार नसल्याचे सांगितले. अमोलने आपल्या मागणीवर ठाम राहत लग्नच मोडले. त्यामुळे एका प्रतिष्ठित कुंटुंबाचे आर्थिक नुकसान तर झाले, शिवाय समाजातही मोठी बदनामी झाली. विशेष म्हणजे, अमोल हा ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारणी विद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत असून त्याचे वडील श्यामराव लांजेवार, आई शारदा लांजेवार व स्वतरू अमोल यांनी मयुरीला पसंत केले होते. असे असतानाही केवळ हुंडय़ासाठी लग्न मोडणारा शिक्षक समाजकंटकच ठरतो. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी अर्जुनी-मोर. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी शिक्षक अमोल व त्यांच्या आईवडिलांना हुंडाबळी अधिनियम अंतर्गत ब्रम्हपुरी येथून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आरोपीने गेल्या दोन वर्षांत अनेक मुलींशी हा प्रकार केला असल्याचे कळते. मुलींना होकार देऊन शेवटी नापसंती करणे, अशाप्रकारे मुलीच्या जीवाशी खेळणाऱ्या शिक्षकाविरुद्ध योग्य कारवाईची मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 12:52 am

Web Title: teacher broke the marriage for dowry
Next Stories
1 बँकांनी महिला बचत गटांना पुरेसे अर्थसहाय्य द्यावे – खा. गवळी
2 गरज सहाशेची मिळाले केवळ ५० पॉस मशीन
3 ‘गारपिटीच्या ठिकाणी 24 तासात पंचनामे करण्याचे आदेश’
Just Now!
X