दहावी परीक्षा केंद्रावर कॉपी करू न दिल्याच्या कारणावरून बठे पथकातील शिक्षिकेला परीक्षेनंतर पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. औसा तालुक्यातील मनोहरतांडा येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी भादा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
मनोहरतांडा येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक आश्रमशाळेतील दहावी परीक्षा केंद्रावर गुरुवारी गणित भाग २ या विषयाचा पेपर होता. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षा मंडळाने जिल्हय़ातील सर्व परीक्षा केंद्रांवर बठे पथकाची नेमणूक केली होती. मनोहरतांडा येथील केंद्रात गुरुवारचा पेपर संपल्यावर पथकातील महिला कर्मचारी केंद्राबाहेर पडल्या. या वेळी औसा-तुळजापूर रस्त्यावर बेलकुंड येथील विष्णू कोळी व अन्य दोघांनी या पथकातील शिक्षिकेला इंडिको मोटार (एमएच २४ सी ८७९७) रस्त्यावर आडवी लावून ‘तू आज सेंटर खूप कडक केलेस, कॉपी करू दिली नाहीस,’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. एवढय़ावरच ते थांबले नाहीत, तर वाईट हेतूने महिला शिक्षिकेचा हात पकडला व पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित सहकाऱ्यांनी तो हाणून पाडला.
या प्रकरणाची माहिती या शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी उज्ज्वल कुलकर्णी यांना कळवली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल महाबोले यांनी या प्रकरणात लक्ष घातले. यानंतर भादा पोलिसांनी विष्णू निवृत्ती कोळी, चालक व अन्य एक अशा तिघांना अटक केली.
या तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, अपहरणाचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी देणे, विनयभंग करणे आदी प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.