राज्यात १२ हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामधील पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध ठिकाणच्या खासगी शाळांमधील मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती आता डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे उमेदवारांना आणखी एका महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी विविध अडथळे पार करावे लागले. शिक्षक भरतीसाठी नियुक्त्या देण्यासाठी पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. ९ ऑगस्टला अभियोग्यताधारकांची मुलाखतीशिवाय यादी प्रसिद्ध झाली होती. त्यातून निवड झालेल्या अभियोग्यताधारकांच्या नियुक्त्या जिल्हा परिषद व काही संस्थांमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीची प्रतीक्षा अभियोग्यता लागून राहिली होती.

राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ८७ हजार उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय शिक्षक भरती करण्याबाबत उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पहिल्या यादीत निवड न झालेल्या व दुसऱ्या निवड यादीला पात्र असलेल्या अभियोग्यताधारकांचा विचार होणार आहे. यात ५ हजार ८२२ उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करून शाळांमधील नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहेत.

निवड यादीत संधी न मिळालेल्या उमेदवारांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जावर नोव्हेंबरमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. यातील पात्र उमेदवारांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी पुढाकार घेतलेला आहे. मुलाखतीसह होणारी शिक्षक भरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. या प्रक्रियेनंतर खासगी शाळांमधील शिक्षक भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात येणार आहे.

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीकडे आस लावून बसलेले उमेदवार विविध प्रकारची माहिती विचारण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयात धाव घेऊ  लागले आहेत. शिक्षक भरतीबाबतच्या सर्व सूचना व वेळापत्रक पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी विनाकारण शिक्षण आयुक्त कार्यालयात गर्दी करू नये, अशा सूचना अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक अभियोग्यताधारकांचे लक्ष डिसेंबर महिन्याकडे लागून राहिले आहे.